आदिवासी मतदारांचेही मोठ्या प्रमाणावर विभाजन
By Admin | Updated: October 11, 2014 01:41 IST2014-10-11T01:41:39+5:302014-10-11T01:41:39+5:30
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदार संघातून आदिवासी प्रवर्गाचेच उमेदवार रिंगणात असतात. मात्र या प्रवर्गात विविध जमाती आदिवासी समुदायातही आहे.

आदिवासी मतदारांचेही मोठ्या प्रमाणावर विभाजन
गडचिरोली : अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदार संघातून आदिवासी प्रवर्गाचेच उमेदवार रिंगणात असतात. मात्र या प्रवर्गात विविध जमाती आदिवासी समुदायातही आहे. त्यामुळे या जमातीनिहाय मतदानावर आदिवासी उमेदवारांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे. आदिवासी समाजात माडिया, राजगोंड, गोंड, परधान, गायतागोंड आदी समुदाय वास्तव्याला आहेत. यांच्या समुदायात शिक्षणाचे प्रमाणही आता झपाट्याने वाढले आहे. आदिवासी प्रवर्गातून अनेक तरूण डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते म्हणून उच्च शिक्षण घेऊन पुढे आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून समाजहितासाठी सर्वसमावेशक काम करीत आहे. तसेच राज्यशासनाच्या अनेक उच्च पदावरील नोकऱ्यांवरही या समाजातून मंडळी कार्यरत असल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उच्चविद्याविभुषीत उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे आदिवासी समुदायातील मतदानाचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. मतदार संघात रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये आपल्या प्रवर्गाचा कोण याचा कानोसा आदिवासी मतदार घेताना दिसून येत आहे. माडिया जमातीचे आदिवासी मतदार आपल्या समाजाच्या मतदाराकडे वळण्यापूर्वी त्याच्या कर्तृत्वाचाही आढावा घेत असताना तरूण मतदार दिसत आहे. परधान समाजाचीही हीच परिस्थिती आहे. आपल्या समाजाचे चार-पाच उमेदवार रिंगणात असल्याने यातील कोणता उमेदवार योग्य याचीही शहानिशा ते करून घेताना दिसत आहे. तसेच आदिवासी समाजातील अनेक मुख्य लोक आहे ते सहकारी संस्था, शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या समाजजीवनात वावरत आलेले आहे. त्यांचा वावर समाजाच्या कक्षा सोडूनही इतर समाजातही राहिलेला आहे. त्यामुळे ते या निवडणुकांमध्ये मुख्य भूमिका बजावित आहेत. आदिवासी मतदार मतदान करताना आजवर या उमेदवारांनी लढविलेल्या निवडणुकांचाही आढावा घेताना दिसत आहे. यातील अनेक उमेदवार कधी या पक्षाकडून तर कधी त्या पक्षाकडून रिंगणात उतरले. जिल्हा परिषद निवडणुकाही काहींनी लढविलेल्या. या साऱ्या बाबी आदिवासी मतदार जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आदिवासी मतांचे गठ्ठा मतदान कुण्या एका उमेदवाराकडे जाणार नाही. ते विभाजीत होईल, असे सारासार चित्र आहे. त्यामुळे गैर आदिवासी मतदार व बंगाली बहूल पट्ट्यात आघाडी घेतलेलाच उमेदवार या निवडणुकीत रिंगणात बाजी मारेल, असे राजकीय जाणकार मानतात. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सीमारेषा ओलांडून आदिवासी प्रवर्गातील गरीब व मागास प्रवर्गाच्याही उमेदवाराच्या बाजुने पारडे झुकू शकते, असा अंदाज आहे.