घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:50+5:302021-02-23T04:54:50+5:30
गडचिराेली : कोरोना संचारबंदीच्या कालावधीत गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या शहरी भागात भाड्याने राहणारे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे व विद्यार्थी स्वगावी ...

घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा
गडचिराेली : कोरोना संचारबंदीच्या कालावधीत गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या शहरी भागात भाड्याने राहणारे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे व विद्यार्थी स्वगावी परतले. तेव्हापासून बऱ्याच घरमालकांच्या खोल्या रिकाम्या आहेत. या घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
अहेरी : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. रबी हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वावरील आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जेनेरिक औषधसाठा वाढविण्याची मागणी
गडचिराेली : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र, काही केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषधसाठा वाढवण्याची मागणी आहे.
तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा
कुरखेडा : शहरातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र, ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकांवरील गावाचे नाव लिहिले असल्याने समजण्यास अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.
विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी
आरमाेरी : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेअंतर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
चामाेर्शी : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांना कुंपणासाठी काटेरी तार पुरवा
कुरखेडा : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाही.
तलावातील अतिक्रमण हटवा
आलापल्ली : आलापल्ली येथील तलावाच्या सभोवताल अतिक्रमणांचा विळखा निर्माण झाला असून विविध प्रकारच्या वनस्पतींनी या तलावाला वेढा घातला आहे. दुर्लक्षितपणामुळे देखभालीअभावी या तलावाचे रूपांतर आता बोडीत झाले आहे. येथील भामरागड मुख्य मार्गावर असलेल्या एकमेव मामा तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. खोलीकरणाअभावी या तलावात अधिक प्रमाणात पाण्याची साठवणूक होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे तलावातील अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे.
वानरदेव मंदिरासाठी निधी द्या
चामोर्शी : तालुक्यातील मुरखळा येथे १५ वर्षापूर्वी उन्हाळ्यात तहानेने कासावीस झालेल्या वानराचा मृत्यू झाला होता. काही दिवसांनंतर सदर ठिकाणी नागरिकांनी वानर मंदिरासाठी पायाचे बांधकाम केले. तसेच येथे एका मूर्तीची प्रतिष्ठापना केली. परंतु मंदिराचे बांधकाम जैसे थे आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रा.पं.क्षेत्रात मिनी पेट्रोलपंपास परवानगी द्या
गडचिरोली : जिल्ह्यात तालुकास्तरावर तसेच शहरी भागातच परवानगी मिळालेले अधिकृत पेट्रोलपंप आहेत. ग्रामीण भागात पेट्रोलपंप नसल्याने पेट्रोल व डिझेलचा तुटवडा भासतो. मुलचेरा तालुक्यात पेट्रोलपंपच नाही. परिणामी लपूनछपून जादा दराने पेट्रोलची विक्री केली जाते. हा प्रकार थांबविण्यासाठी शासनाने महसुली मंडळ कार्यालय क्षेत्रात किंवा ग्रा.पं.क्षेत्रात पेट्रोलपंपासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी हाेत आहे.
बचतगटांना कर्जपुरवठा करण्याची मागणी
अहेरी : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम पडला आहे. यामध्ये बचतगटांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचतगटांना कर्जपुरवठा करून त्यांना जीवनदान देणे सध्यातरी गरजेचे आहे.
प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी
एटापल्ली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
काेरची : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर पंचायतीकडे केली आहे.
बायोगॅससाठी अनुदान वाढविण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्या प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग होण्यासाठी मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांना बायोगॅससाठी अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी आहे.
पीएचसी परिसर बनले कुरण
मानापूर/देलनवाडी : आरमाेरी तालुक्याच्या देलनवाडी येथे प्राथमिक आराेग्य केंद्र आहे. येथील इमारतीसभाेवताल संरक्षक भिंत आहे. तरीसुद्धा मुख्य गेट परिसरातील माेकाट जनावरे आत शिरतात. त्यानंतर दिवसरात्र तेथेच चरत असतात. माेकाट जनावरांकडे येथील पशुपालकांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करून माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.