जमीन महसुलावर भर
By Admin | Updated: May 7, 2014 02:19 IST2014-05-07T02:19:36+5:302014-05-07T02:19:36+5:30
जिल्ह्याला संपूर्ण आर्थिक स्त्रोतांच्या सहाय्याने २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ३५६ कोटी ९४

जमीन महसुलावर भर
: २०१३-१४ मधील जिल्ह्याचे एकूण उत्पन्न ३५७ कोटी रुपये खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यंत कमी
गडचिरोली : जिल्ह्याला संपूर्ण आर्थिक स्त्रोतांच्या सहाय्याने २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ३५६ कोटी ९४ लाख ८९ हजार १३४ रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षीच्या तुलनेत २०१३-१४ या वर्षाचे उत्पन्न ६३ कोटी ८७ लाख ४० हजार ७७ रूपयाने कमी आहे. नागरिक विविध करांच्या माध्यमातून शासनाकडे पैसा भरत असतात. याची सर्व नोंद जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये ठेवण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये महामंडळावरील करांच्या माध्यमातून केवळ ५२० रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीवर सरकार आयकर आकारते. मागील वर्षी इन्कम टॅक्सच्या माध्यमातून ३ कोटी ४३ लाख ६८ हजार २४० रूपये एवढा महसूल शासनाकडे जमा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात एकमेव रोजगाराचे साधन शेती आहे. लाखो हेक्टर शेतीवर धान पीक व इतर पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. शासन शेतीवर जमीन महसूल आकाराते. मागील वर्षी ११ कोटी ७७ लाख ६३ हजार ३४ रूपये एवढा जमीन महसूल शासनाकडे जमा करण्यात आला. स्टॅम्प व नोंदणी शुल्काच्या माध्यमातून ६ कोटी ६५ लाख ६ हजार २६६ रूपये, स्टेट एक्साईजच्या माध्यमातून ६३ हजार ४६५ रूपये, विक्रीकराच्या माध्यमातून ३ कोटी ४६ लाख ४० हजार १८९ वाहन कराच्या माध्यमातून ७ कोटी १० लाख ४२ हजार ८६९ रूपयाचा निधी शासनाकडे जमा करण्यात आला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये सर्व मार्गाने मिळून गडचिरोली जिल्ह्याला ३५६ कोटी ९४ लाख ८९ हजार १३४ रूपये एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०१२-१३ गडचिरोली जिल्ह्याला ४२० कोटी रूपये ८२ लाख २९ हजार २११ रूपये एवढे उत्पन्न प्राप्त झाले होते. २०१२-१३ च्या तुलनेत २०१३-१४ चे उत्पन्न ६३ कोटी ८७ लाख ४० हजार ७७ रूपयाने कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासासाठी शेकडो योजनांवर शासन कोट्यवधी रूपयांची उधळण करीत असले तरी रोजगाराचे साधन व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा वापर करण्यामध्ये अजूनपर्यंत यश प्राप्त झाले नाही.
त्यामुळे येथील नागरिकांचे उत्पन्न कमी आहे. केवळ जमीन महसूल व वनोपजापासून मिळणारे उत्पन्न हे दोनच महत्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. शासनाने येथील साधन संपत्तीचा वापर करून उद्योग निर्मिती केल्यास या उद्योगाच्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होईल. मात्र अजूनपर्यंत शासनाला यामध्ये यश आलेले नाही. (प्रतिनिधी) ४२०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांवर विविध योजनांच्या माध्यमातून १ हजार ८७८ कोटी ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले. याचवर्षी गडचिरोली जिल्ह्यातून संपूर्ण मार्गाने केवळ ३५६ कोटी ९४ लाख रूपयाचे उत्पन्न शासनाला प्राप्त झाले. आकडेवारीचे निरीक्षण केल्यास खर्चाच्या तुलनेत जिल्ह्याचे उत्पन्न अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. जिल्ह्यामध्ये उद्योग, व्यवसायांची भरभराट झाली नाही. कोट्यवधी रूपयाची साधन संपत्ती असली तरी तिचे खोदकाम अजूनपर्यंत सुरू झाले नाही. त्यामुळे यापासून मिळणार्या उत्पन्नाला वंचित राहावे लागत आहे. जंगलातून मिळणारा तेंदूपत्ता, बांबू व सागवान यापासून वनविभागाला थोडेफार उत्पन्न प्राप्त होते. मात्र सदर उत्पन्न इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. नागरिकांचे वार्षिक उत्पन्न कमी असल्याने आयकर भरणार्यांची संख्या सुद्धा कमी आहे. रोजगार व उद्योग भरभराटीला आला नसल्याने विक्रीकर यासारख्या करांची रक्कम इतर जिल्ह्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.