लक्ष्मी मने यांचा उमेदवारी अर्ज रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 02:07 IST2017-02-10T02:07:28+5:302017-02-10T02:07:28+5:30
आरमोरी तालुक्यातील पळसगाव-अरसोडा जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लक्ष्मी हरिष मने

लक्ष्मी मने यांचा उमेदवारी अर्ज रद्द
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील पळसगाव-अरसोडा जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लक्ष्मी हरिष मने यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. लक्ष्मी मने यांनी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र त्या प्रमाणपत्रावर नियमितपणे शौचालयाचा वापर करीत असल्याबाबतचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरविला आहे.
विद्यमान जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी मने यांनी पळसगाव-अरसोडा जिल्हा परिषद क्षेत्रातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. यासाठी त्यांनी पळसगाव येथील मुकरू निंबार्ते यांच्या १८१ क्रमांकाच्या घरी राहत असल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र निंबार्ते यांच्या घरी शौचालय नसल्याने त्यांनी राजेंद्र मने यांचे शौचालय वापरत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र या प्रमाणपत्रावर शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याबाबत लिहिण्यात आले नव्हते.
याबाबत मनिषा दोनाडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला व उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष्मी मने यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला. याविरोधात दोनाडकर यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली. जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती नियमानुसार शौचालय असण्यासोबतच शौचालयाचा वापर नियमितपणे करीत असल्याचेही प्रमाणपत्र गरजेचे आहे. मात्र लक्ष्मी मने यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावर शौचालयाचा नियमितपणे वापर करीत असल्याबाबतचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट करीत मनिषा दोनाडकर यांच्या बाजुने निर्णय देत लक्ष्मी मने यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. सदर निकाल जिल्हा सत्र न्यायाधिश यू. एम. पदवाड यांनी दिला. अपिलार्थीच्या वतीने अॅड. नितेश लोडलीवार यांनी बाजू मांडली. (नगर प्रतिनिधी)
शिल्पा रॉय यांचा अर्ज कायम
चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर-वायगाव जि.प. क्षेत्रातून शिल्पा धर्मा रॉय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला कल्पना बंडावार यांनी आव्हान दिले. धर्मा रॉय यांना चार मुले आहे. शिल्पा रॉय ही दुसरी पत्नी आहे. धर्मा रॉय यांना चार मुले असल्याने शिल्पा रॉय यांचा नामांकन अर्ज रद्द करावा, अशी मागणी बंडावार यांनी केली होती. मात्र न्यायालयाने निर्णय देताना उमेदवाराला किती अपत्य आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे नमूद करीत धर्मा रॉय यांना कितीही मुले असले तरी उमेदवार असलेल्या शिल्पा रॉय यांना एकच मुलगा आहे. त्यामुळे शिल्पा रॉय यांचा अर्ज वैध ठरविला आहे.