बैलबंड्यांसह पावणेतीन लाखांचे सागवान जप्त
By Admin | Updated: April 30, 2015 01:36 IST2015-04-30T01:36:13+5:302015-04-30T01:36:13+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचारी व मजुरांनी आसरअल्ली वन परिक्षेत्रातील अंकिसा नदी घाटावर ...

बैलबंड्यांसह पावणेतीन लाखांचे सागवान जप्त
आसरअल्ली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचारी व मजुरांनी आसरअल्ली वन परिक्षेत्रातील अंकिसा नदी घाटावर धाड टाकून चार बैलबंड्यांसह पावणे तीन लाखांचे सांगवान लठ्ठे जप्त केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी एका वनतस्कराला अटक करण्यात आली आहे.
अंकलू रामलू पाले रा. जंगलपल्ली असे सागवान लठ्ठे तस्कर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आसरअल्ली वन परिक्षेत्रात अंकिसा नदी घाटावरून बैलबंड्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात सागवान लठ्ठ्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आसरअल्लीचे क्षेत्र सहायक व्ही. जी. राजुरकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ आपल्या वन कर्मचारी व वनमजुरांसह अंकिसा नदी घाटावर धाड टाकली असता, काही वनतस्कर बैलबंड्या व सागवान लठ्ठे तिथेच टाकून पसार झाले. वनतस्कर अंकलू रामलू पाले याला पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले. सदर कारवाई सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी बेलेकर, आसरअल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी डी. जी. रामटेके यांच्या नेतृत्वात आसरअल्लीचे क्षेत्र सहायक व्ही. बी. राजुरकर, वनकर्मचारी व वनमजुरांनी केली.
वनतस्कर आरोपीला अटक करून बैलबंड्यांसह १४ नग सागवान लठ्ठ्यांना आसरअल्लीच्या वन परिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात आणण्यात आले. वनतस्कर आरोपी अंकलू पाले याच्यावर वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)
वनकर्मचाऱ्यांनी अंकिसा नदी घाटावर धाड टाकून २.१३६ घन मीटर आकाराचे एकूण १४ सागवान लठ्ठे पकडले. जप्त करण्यात आलेल्या आठ बैलबंड्यांची किमत प्रत्येकी १० हजार रूपये प्रमाणे एकूण ४० हजार रूपये आहे. आठ बैल पकडले असून याची किमत २० हजार रूपये प्रमाणे एक लाख ६० हजार रूपये आहे. एकूण दोन लाख ८६ हजार ४६१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.