वाहनासह पावणेतीन लाखांचे धान्य जप्त
By Admin | Updated: February 18, 2015 01:16 IST2015-02-18T01:16:03+5:302015-02-18T01:16:03+5:30
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून आरोपींकडून वखार महामंडळाच्या गोदामातून वाहनाद्वारे गडचिरोलीत आणण्यात येणाऱ्या तांदळाचे ४० पोते जप्त..

वाहनासह पावणेतीन लाखांचे धान्य जप्त
गडचिरोली : गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून आरोपींकडून वखार महामंडळाच्या गोदामातून वाहनाद्वारे गडचिरोलीत आणण्यात येणाऱ्या तांदळाचे ४० पोते जप्त केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
नवनाथ विलास गोरे (३०) रा. गांधीवार्ड गडचिरोली, प्रशांत लहानू डांगे (३०) गडचिरोली व विजय परशुराम उईके (२८) रा. मिचगाव (धानोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोर्लावरून आरमोरी मार्गे हे तिघे आरोपी एमएच ३३ जी १९५८ या वाहनाने गहू व तांदळाचे मिळून ११ पोते गांधी वार्डात आणून गोरे यांच्या घरी उतरवीत होते. संशय बळावल्यानंतर पोलिसांनी गोरे यांच्या घरी धाड टाकली असता, पोलिसांना तांदळाचे अवैध ४० पोते आढळून आले. वखार महामंडळाच्या गोदामातून पुरवठा होणाऱ्या धान्याची हमालामार्फत अफरातफर करण्याच्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकून या संदर्भात कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)