मार्कंडेश्वराच्या पालखीचे घेतले लाखो भाविकांनी दर्शन
By Admin | Updated: February 28, 2017 00:45 IST2017-02-28T00:45:18+5:302017-02-28T00:45:18+5:30
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मार्र्कंडेश्वराची पालखी सोमवारी काढण्यात आली. यावेळी यात्रेतील लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

मार्कंडेश्वराच्या पालखीचे घेतले लाखो भाविकांनी दर्शन
चौथ्या दिवशी गर्दी कायमच : सनई, चौघडे व भजन मंडळही दिंडीत सहभागी
चामोर्शी/मार्र्कंडादेव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मार्र्कंडेश्वराची पालखी सोमवारी काढण्यात आली. यावेळी यात्रेतील लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मार्र्कंडा येथील मराठा धर्मशाळेच्या परिसरातून मार्र्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. सदर पालखी यात्रेमध्ये फिरविण्यात आली. ढोल, ताशे, सनईच्या गजरात व भजनाच्या निनादात हर हर महादेवच्या गजरात पालखी काढण्यात आली. दरम्यान संपूर्ण मार्र्कंडा नगरी हर हर महादेवच्या गजराने दुमदुमली होती. पालखीच्या सुरूवातीला श्री मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरात शिवलिंगाची आरती व पूजा ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी बालस्वामी पिपरे महाराज, रामू महाराज, मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, पा. गो. पांडे, सहसचिव रामूजी तिवाडे, रामप्रसाद मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, उपाध्यक्ष रामेश्वर काबरा, सचिव अशोक तिवारी, सहसचिव केशव आंबटवार, विश्वस्त प्रकाश कापकर, मोरेश्वर कतरे, हरिभाऊ खिनखिनकर, गोपाल रणदिवे, चरणदास उजेडे महाराज, जनार्धन जुनघरे, पुरूषोत्तम शेंडे आदी उपस्थित होते. पालखीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रविवारी जाळला टिपूर
मार्र्कंडादेव येथे यात्रा काळात टिपूर लावण्याची परंपरा गोंडराजांपासून चालत आली आहे. रविवारी वैनगंगा नदीच्या तिरावर टिपूर लावण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, उमेश, उज्वल गायकवाड, ऋषी आभारे, रामू तिवारे आदी उपस्थित होते. तिसऱ्या व चौथ्या दिवशीही यात्रेत भाविकांची गर्दी कायमच होती.