आरमोरी तालुक्यातील तलाव बोड्या अजूनही कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:33+5:302021-09-05T04:41:33+5:30

आरमोरी तालुक्यात सिंचनाची फारशी सुविधा नाही त्यामुळे तालुक्यातील ७० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी आरमोरी ...

The lakes in Armori taluka are still dry | आरमोरी तालुक्यातील तलाव बोड्या अजूनही कोरड्याच

आरमोरी तालुक्यातील तलाव बोड्या अजूनही कोरड्याच

आरमोरी तालुक्यात सिंचनाची फारशी सुविधा नाही त्यामुळे तालुक्यातील ७० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी आरमोरी तालुक्यात पावसाला जोर नाही. शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली तेव्हापासूनच तर आजपर्यंत म्हणावा तसा पाऊस पडला नाही. दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील मामा तलाव, नाले, बंधारे व बोड्या पावसाच्या पाण्याने फुल्ल व्हायच्या मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे तलाव बोड्यात ठणठणाट आहे.

आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी, शेततळे बांधले. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअर मारले त्यामुळे ते कसेतरी आपले पीक वाचवतील; परंतु ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची सिंचन सुविधा नाही, असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांची अडचण होणार आहे. तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांना गावशेजारी असलेल्या मामा तलावाचे पाणी निस्तार हक्काप्रमाणे शेतीला लागू आहे मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नसल्याने तेही अजून भरले नाही. त्यामुळे पाऊस असाच पुढेही हुलकावणी देत राहिला तर पुढे धान पिकाला कुठले पाणी द्यायचे, अशी चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे. आकाशात जमणारे काळेभोर ढग पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. मात्र प्रत्यक्षात शेतात साचणार असा पाऊस येत नाही.

बाॅक्स

गतवर्षीही बसला फटका

मागील वर्षी कोरोनाच्या संकटाने शेतकऱ्यांचा रोजगार बुडाला त्यानंतर गतवर्षी आलेल्या महापुराने धान पिके बुडून राहिल्याने पिकाची माती झाली. जे त्यातून सावरले त्यांनाही विविध रोगाच्या प्रादुर्भावाने पछाडले परिणामी मागील वर्षी उत्पन्नात मोठी घट झाली. झालेला खर्चही भरून निघाला नाही. दरवर्षी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षीही चटके बसायला सुरुवात झाली आहे.

Web Title: The lakes in Armori taluka are still dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.