शिवणी बुज येथे लाखोळी जळून खाक
By Admin | Updated: February 17, 2015 01:46 IST2015-02-17T01:46:54+5:302015-02-17T01:46:54+5:30
आरमोरी : जीवंत विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगी उडाल्यामुळे लागलेल्या आगीत दीड एकरातील खोदून

शिवणी बुज येथे लाखोळी जळून खाक
दीड एकरातील नुकसान : शार्ट सर्किटने आग
आरमोरी : जीवंत विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगी उडाल्यामुळे लागलेल्या आगीत दीड एकरातील खोदून जमा केलेले लाखोळीचे ढीग जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील शिवणी बुज येथे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकरी नारायण मुरारी पत्रे यांचे जवळपास १५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
शिवणी बुज येथील शेतकरी नारायण पत्रे यांनी यंदाच्या रबी हंगामात आपल्या दीड एकरच्या शेतात लाखोळीची पेरणी केली. निसर्गाने साथ दिल्यामुळे लाखोळीचे पीक बहरले. शेतकरी पत्रे यांनी काही दिवसापूर्वीच लाखोळी खोदून त्याचे ढीग शेतात गोळा केले होते. मात्र अचानक जीवंत विद्युत तारांच्या घर्षणामुळे शेतात आग लागली. या आगीत संपूर्ण लाखोळीचे ढीग जळून खाक झाले.
सदर शेतकऱ्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी पत्रे यांचे १५ हजार रूपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची शेतकरी पत्रे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)