बँक शाखेत सोशल डिस्टन्सिंगचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:21+5:30

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग राखत आहेत. व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवून आपली कामे करीत आहेत.

Lack of Social Distance at Bank Branch | बँक शाखेत सोशल डिस्टन्सिंगचा अभाव

बँक शाखेत सोशल डिस्टन्सिंगचा अभाव

ठळक मुद्देलॉकडाऊन वाढल्याचा परिणाम : आठवड्याच्या पहिल्या दिवशी अहेरी शहर व तालुक्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र महाराष्टÑ सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविली. संचारबंदीची मुदत वाढल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारला बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. मात्र यावेळी कामाच्या घाईगडबडीत सोशल डिस्टन्सिंगची वाट लागल्याचे दिसून आले.
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग राखत आहेत. व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवून आपली कामे करीत आहेत. मात्र शहरी भागात बऱ्याच ठिकाणी परिस्थिती यापेक्षा उलट आहे. १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय व सर्वच बँकांचे कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे आपले आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी ग्राहकांनी राष्टÑीयकृत बँकांमध्ये गर्दी केली. लगबगीने काम आटोपून घेण्याच्या नादात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
बँकांसारखीच किराणा दुकानांत लोकांची गर्दी दिसून आली. १ मीटरचे अंतर राखण्याबाबतचा नियम कोणीही पाळत नसल्याचे दिसून आले. येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही नागरिकांनी अशीच गर्दी केली होती. पोलीस विभागातर्फे अनेक ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. मात्र नागरिक गल्लीबोळातून आपली वाट काढत फिरत असल्याचे चित्र अहेरी शहरात दिसून येत आहे.
अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांना बँकेत गर्दी होत असल्याची माहिती कळताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, पोलीस उपनिरीक्षक आसावरी शेडके, पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, रूपा काळे यांच्यासह बँक कार्यालय गाठले. नागरिकांची गर्दी दूर केली. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बँक आॅफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेत सोमवारी ग्राहकांची गर्दी दिसून आली. बँक शाखा तसेच इतर शासकीय कार्यालयातर्फे नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी काहीच प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच नागरिकांची गर्दी झाली. तसेच नागरिक एकमेकांच्या जवळून रांग लावून होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

पेट्रोल पंपावर संचारबंदीचे उल्लंघन
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. पेट्रोलपंप, किराणा दुकान, रूग्णालये, औषधी दुकान सुरू आहेत. मात्र अहेरी शहरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होत असून संचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे. अहेरीच्या पेट्रोलपंपावर सध्यास्थिती पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी दिसते. तहसीलदारांनी पेट्रोल कोणा-कोणाला द्यायचे यासाठी २०३ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे विक्रेते, दूध व्यावसायिक तसेच अत्यावश्यक काम असलेल्या कर्मचाºयांना पेट्रोल दिले जात आहे. संचारबंदीची अंमलबजावणी करून व सुरक्षित अंतर ठेवून वाहनधारकांनी पेट्रोल टाकणे गरजेचे आहे. मात्र अहेरीच्या पेट्रोलपंपावर वाहनधारकांची गर्दी होत असून सामाजिक डिस्टन्सिंगची वाट लागली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Lack of Social Distance at Bank Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.