वीज जोडणी व पाईप पुरवठ्याचा अभाव; शेतकरी हवालदिल

By Admin | Updated: September 10, 2015 01:30 IST2015-09-10T01:30:17+5:302015-09-10T01:30:17+5:30

आरमोरी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना अनुदानावर मोटारपंप पुरविण्यात आले. मात्र विद्युत जोडणी करण्यात आली नाही.

Lack of electricity connection and piped supply; Hire the farmer | वीज जोडणी व पाईप पुरवठ्याचा अभाव; शेतकरी हवालदिल

वीज जोडणी व पाईप पुरवठ्याचा अभाव; शेतकरी हवालदिल

कृषी व विद्युत विभागाचा भोंगळ कारभार : शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर
जोगीसाखरा/मार्र्कंडादेव : आरमोरी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना अनुदानावर मोटारपंप पुरविण्यात आले. मात्र विद्युत जोडणी करण्यात आली नाही. तसेच चामोर्शी तालुक्यात योजनेंतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोटारपंप दिले. मात्र पाईपचा पुरवठा केला नाही. तसेच महावितरणच्या वतीने वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून कृषी व विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सिंचन विहिरी खोदल्या आहेत. कृषी विभागाच्या वतीने विहीर व पाण्याचे स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावर कृषिपंप पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बचतगटांकडून कर्ज घेऊन पैशाची जुडवाजुडव केली व त्यानंतर महावितरणकडे वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र महावितरणच्या वतीने अद्यापही कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात आली नाही. अत्यल्प पाऊस असल्यामुळे रोवणी झालेले धानपीक वाचवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
चामोर्शी तालुक्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मोटारपंपचा पुरवठा करण्यात आला. मात्र यासाठी लागणारे पाईपचा पुरवठा करण्यात आला नाही. तसेच कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असूनही वीज जोडणी व पाईपअभावी शेतकऱ्यांचे कृषिपंप धूळखात पडले आहे. यासंदर्भात तालुका कृषी कार्यालय चामोर्शीकडे विचारणा केली असता, आमच्या कार्यालयात पाईपचा पुरवठा झाला नाही, असे उत्तर मिळाले. एकूणच शेतकरी अडचणीत आहे.
धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
दरवर्षीच्या तुलनेत यंदा गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. मात्र कृषी विभागाने रोवणी व आवत्यांची खोटी टक्केवारी दिली असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने यंदा झालेल्या पावसाची आकडेवारी फुगवून सांगितली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे शेतातील धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केवीलवाणी धडपड सुरू असल्याचे दिसून येते.
दुष्काळ परिस्थितीचे सर्वेक्षण करून मदत द्या
यंदा निसर्गाने लहरीपणा दाखविला. सुरुवातीच्या काळात पाऊस पडल्यानंतर पावसाने कायमची उसंत घेतली. त्यामुळे शेत जमिनीतील धानपिकाचे पऱ्हे करपायला लागले. अशावेळी शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून कृषिपंपाच्या सहाय्याने पऱ्हांना पाणीपुरवठा केला. त्यानंतर दोन ते तीन दिवस पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा निसर्गाने डोळे वटारल्याने रोवणीचा हंगाम धोक्यात आला. नापिकीची परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Lack of electricity connection and piped supply; Hire the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.