शेतकऱ्यांत जागृतीचा अभाव
By Admin | Updated: July 6, 2014 23:56 IST2014-07-06T23:56:12+5:302014-07-06T23:56:12+5:30
शेतात कष्टाचे कामे करीत असतांना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून आर्थिक मदत दिल्या जाते. मात्र या योजनेविषयी

शेतकऱ्यांत जागृतीचा अभाव
केवळ दोन प्रकरणे प्राप्त : शेतकरी जनता अपघात विमा योजना
गडचिरोली : शेतात कष्टाचे कामे करीत असतांना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून आर्थिक मदत दिल्या जाते. मात्र या योजनेविषयी अनेक शेतकऱ्यांना माहितीच नसल्याने याबद्दलची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पोहोचविली जात नाही. त्यामुळे अनेक मृतकांचे कुटुंब या योजनेपासून वंचित राहिले आहेत. २०१३-१४ या आर्थिक वर्षात केवळ दोन प्रकरणे दाखल करण्यात आली. यावरून या योजनेविषयी सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
शेतीची कामे करीत असतांना वीज पडणे, विजेचा झटका लागणे, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील वाहनाने अपघात, जनावराने चावल्याने किंवा हल्ला केल्याने, खून झाल्यास, दंगलीत मृत्यू झाल्यास किंवा शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा, यासाठी शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांचा विमा शासन काढतो. शेतकऱ्याचा शेतीची कामे करीत असतांना अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ घेता येते. त्यासाठी सातबारावर शेतकऱ्याचा नावाचा समावेश असणे आवश्यक आहे. ही योजना १० ते ७५ या वयोगटातील सर्व महिला व पुरूष शेतकऱ्यांना लागू आहे.
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनी विहित नमुन्यातील दाव्यासाठी अर्ज कृषी पर्यवेक्षक यांच्या मार्फतीेन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर प्रमाणपत्रांची चौकशी करून कंपनी मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करते.
गडचिरोली जिल्ह्यात २०११-१२ या वर्षात ३२ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी २१ प्रकरणे विमा कंपनीकडून रद्द करण्यात आली. केवळ ११ कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षात ४३ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी १९ प्रकरणे कंपनीकडून रद्द करण्यात आली तर ११ प्रकरणे मंजूर करण्यात आली. २०१३-१४ या आर्थिक वर्षात फक्त दोन प्रकरणे प्राप्त झाली. दोन्ही प्रकरणे विमा कंपन्यांनी मंजूर केली आहेत.
या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला केवळ अर्ज सादर करणे एवढेच कष्ट घ्यावे लागते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेविषयीची माहिती नाही, ही सर्वात मोठी अडचण नाही. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकाची आहे. मात्र कृषी सहाय्यक हे महिन्यातून एक वेळा त्याच्या कार्यक्षेत्रातील गावाला भेट देतात. असंख्य नागरिक तर कृषी सहाय्यकाला ओळखतसुद्धा नाही. त्यामुळे एखादी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर कोसळून त्याचा मृत्यू झाला तरी याबद्दलची माहिती कृषी सहाय्यकाला कळविली जात नाही. आजही ७५ टक्के नागरिकांना या योजनेविषयी माहिती नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाभरात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीने हजारो शेतकरी मृत्यूमुखी पडतात. त्या तुलनेत कृषी विभागाकडे सादर केलेली प्रकरणे अत्यंत नगण्य आहेत. प्राप्त झालेल्या प्रकरणांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरणे विमा कंपनी विविध कारणे देऊन रद्द करते. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला कमी लाभ मिळतो. प्रकरण सादर झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या वारसदारांना बचत खात्यात विम्याची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये वर्ष लोटूनही कंपनीकडे सदर प्रकरण प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे दोन डोळे निकामी झाल्यास, दोन अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयापर्यंतची नुकसानभरपाई दिली जाते. एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास ५० हजार रूपयाची नुकसानभरपाई दिल्या जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून सदर योजनेविषयीची जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)