कमी मजुरीने घाटीतील मजूर संतप्त
By Admin | Updated: July 7, 2017 01:22 IST2017-07-07T01:22:47+5:302017-07-07T01:22:47+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या घाटी येथील मजुरांना अत्यंत कमी मजुरी मिळाली

कमी मजुरीने घाटीतील मजूर संतप्त
तहसीलदारांना निवेदन : १० जुलै रोजी बसस्थानकासमोर चक्काजाम करण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या घाटी येथील मजुरांना अत्यंत कमी मजुरी मिळाली आहे. कामानुसार मजुरी द्यावी, याबाबतचे निवेदन मजुरांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, घाटी ते चारगाव रिठ पांदन रस्त्याचे एक किमी अंतराचे माती काम १ जून ते २६ जून या कालावधीत करण्यात आले. कामाप्रमाणे मजुरी मिळाली नसल्याचे मजुरांच्या लक्षात आल्यानंतर मजूर संतप्त झाले. ग्राम रोजगार सेवक रूपेश संपत लाडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पात्रेकर हे कमी मजुरी देण्यास जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. ४ जुलै रोजी मजुरांच्या स्वाक्षरीनिशी लेखी तक्रार कुरखेडा तहसीलदार संवर्ग विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले. रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार मजुरी मिळण्यास १५ दिवसांचा विलंब झाल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मजुरी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. वाढीव मजुरी प्राप्त न झाल्यास १० जुलै रोजी सकाळी १० वाजता बसस्थानक घाटी येथील मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
कमी मजुरीबाबत मजुरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तहसीलदारांनी कामाचे पुनर्मापण करून त्यानुसार मजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही मजुरी मिळाली नाही. त्यामुळे मजूर अडचणीत आले आहेत. त्यामुळे ते संतप्त असल्याचे दिसून येत होते.