सुकाळातील मजुरांची मजुरी थकली
By Admin | Updated: May 27, 2015 01:39 IST2015-05-27T01:39:02+5:302015-05-27T01:39:02+5:30
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या १०० मजुरांची मजुरी आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही मिळाली नाही. याबाबत ग्रामसेवक उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे.

सुकाळातील मजुरांची मजुरी थकली
वैरागड : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या १०० मजुरांची मजुरी आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही मिळाली नाही. याबाबत ग्रामसेवक उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. त्यामुळे मजुरांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
परिसरातील सुकाळा येथील पत्रुजी गेडाम ते रामसुजी नैताम यांच्या शेतापर्यंतच्या पांदण रस्त्याच्या दोन्ही बाजुस वृक्ष लागवडीचे काम करण्यात आले. या रोपांना कुंपण घालण्यासाठी आॅक्टोबर २०१४ मध्ये १०० मजूर कामावर लावण्यात आले होते. या कामाला आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अजूनपर्यंत रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी मिळाली नाही. याबाबत रोहयो मजूर ग्रामसेवक रामटेके व रोजगारसेवक निकोडे यांना विचारणा करीत आहेत. मात्र ते उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. याबाबत मजुरांनी आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र या तक्रारीचाही काहीच फायदा झाला नाही. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुलाब इन्कने, महागू मोहुर्ले, पत्रू गेडाम, रामदास सहारे, जगण मेश्राम आदींनी केली आहे.
आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही मजुरी न मिळाल्याने मजूर कमालीचे संतप्त झाले आहेत. आठ दिवसांच्या आत मजुरी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मजुरांनी दिला आहे. रोहयो काम करणारे बहुतांश मजूर हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीचा हंगाम जवळ आल्याने त्यांच्याकडून बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करणे सुरू केले आहे. या कामाची मजुरी मिळाली असती तर शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासली नसती. (वार्ताहर)