रोहयो कामावर न गेलेल्या मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2016 01:44 IST2016-06-09T01:44:49+5:302016-06-09T01:44:49+5:30
इटिया डोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग वडसा सिंचाई व्यवस्थापक कार्यालय आरमोरीच्या वतीने महात्मा गांधी

रोहयो कामावर न गेलेल्या मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा
आरमोरी : इटिया डोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग वडसा सिंचाई व्यवस्थापक कार्यालय आरमोरीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या मायनरच्या कामावर काम करणाऱ्या वघाळा येथील मजुरांना अतिशय कमी मजुरी देण्यात आली. याउलट कामावर न गेलेल्या मजुरांची हजेरी लावून त्याच्या बँक खात्यात अधिकची रक्कम जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
इटिया डोह प्रकल्पाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाच्या संगनमताने सदर प्रकार झाल्याचा संशय मजुरांनी व्यक्त केला असून काम करणाऱ्या मजुराचे आर्थिक शोषण करणाऱ्या व कामावर न जाणाऱ्या मजुराच्या खात्यात पैसे जमा न करणाऱ्यावर कारवाई करून कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वघाळा येथील संतप्त मजुरांनी केली आहे. इटिया डोह सिंचाई व्यवस्थापन कार्यालयातर्फे रोहयो अंतर्गत मायनर क्रमांक २ च्या नहराचे मातीकाम करण्यात आले. सदर माती कामाकरिता २२ लाख ७८ हजार ७४६ रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर नहराच्या कामावर वघाळाचे जवळपास अडीचशेवर मजूर काम करीत आहेत. या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या रोजगार सेवकाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाच्या संगनमताने कामावर न गेलेल्या मजुराची हजेरी लावून त्याची रक्कम बँकेच्या खात्यात जमा केली. मातीकामावर न जाणाऱ्या नऊ मजुरांना मस्टर क्रमांक १ मध्ये कामावर हजर असल्याचे दाखवून त्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी ९८४ रूपये जमा केले. जे मजूर प्रत्यक्ष कामावर होते त्यांना अत्यंत कमी मजुरी देण्यात आली. मस्टर क्रमांक २ मध्ये दोन मजूर कामावर नसताना सुध्दा त्यांच्या बँक खात्यात १ हजार १०४ रूपये जमा करण्यात आले. मस्टर क्रमांक १ मध्ये कमी मजुरी पडलेल्या मजुरांनी रोजगार सेवकांना मस्टर दाखविण्याची मागणी केली असता, मजुरांना मस्टर दाखविण्यास त्याने टाळाटाळ केली. (वार्ताहर)
असा आला प्रकार उघडकीस
संतप्त झालेल्या रोहयो मजुरांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा दोनाडकर यांना घटनास्थळी बोलाविले. त्यानंतर सरपंच दोनाडकर यांनी इटिया डोह सिंचाई व्यवस्थापन कार्यालय आरमोरीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चापले यांना बोलाविले. त्यांना मस्टरची कॉपी मागितली असता, सदर प्रकार उघडकीस आला. या मस्टरच्या कॉपीमध्ये कामावर न गेलेल्या मजुरांची नावे हजेरी पटावर दिसून आली. मंगळवारी सायंकाळी वघाळा येथील मजुरांनी ग्रामपंचायत गाठून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सरपंच दोनाडकर तसेच हिरा प्रधान, पुरूषोत्तम धोटे, किसन राऊत, रामभाऊ धोटे, अन्ना लिंगायत, पुंडलिक दोनाडकर, मुर्लीधर दोनाडकर, अरूण ढोरे, पुंडलिक बुल्ले आदी मजूर हजर होते.
रोजगार हमी योजनेच्या कामावर रोजगारसेवक मजुरांची हजेरी घेतात. सिंचाई व्यवस्थापन कार्यालयातर्फे सध्या अनेक कामे सुरू असल्यामुळे सर्वच कामांवर १०० लक्ष देणे शक्य होत नाही. रोजगार सेवकाच्या चुकीमुळे सदर प्रकार झाला असावा.
- सी. टी. चापले, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, इटिया डोह सिंचाई व्यवस्थापन कार्यालय, आरमोरी