कुरखेडात चक्काजाम आंदोलन
By Admin | Updated: September 4, 2015 01:23 IST2015-09-04T01:23:14+5:302015-09-04T01:23:14+5:30
मागील पाच दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाने रामगड, पुराडा, कोरचीला जाणारी सायंकाळची बस बंद केली.

कुरखेडात चक्काजाम आंदोलन
शिवसेना कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी : रामगड, पुराडा, कोरचीसाठी सायंकाळची बस सोडा
कुरखेडा : मागील पाच दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाने रामगड, पुराडा, कोरचीला जाणारी सायंकाळची बस बंद केली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना घराकडे परत जाण्यास उशीर होत होता. सदर बस विद्यार्थ्यांच्या सुटीच्या वेळेवर सोडण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्त्वात शिवसेना कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी सायंकाळी चक्काजाम आंदोलन केले.
रामगड, पुराडा व कोरची परिसरातील जवळपास ३०० विद्यार्थी दर दिवशी कुरखेडा येथे शिकण्यासाठी येतात. विद्यार्थिनींसाठी मोफत बससेवा आहे. त्याचबरोबर या मार्गावर खासगी वाहनांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसनेच ये-जा करावी लागते. या सर्व मार्गावरून शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर बस सुरू असताना मागील पाच दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने या मार्गावरील बस अचानक बंद केली. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींची फारमोठी पंचाईत झाली. रात्री ७ वाजेपर्यंत विद्यार्थी कुरखेडा येथेच बसची वाट बघत राहत होते. रात्री ८ ते ८.३० वाजेपर्यंत कोरची, कोटगुल येथे पोहोचत होते.
त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सदर बाब शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या लक्षात आणून दिली. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्याचवेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सायंकाळी ५ वाजता चक्काजाम आंदोलन केले. यावेळी दिगांबर मानकर, नरेंद्र किरणकर, सोनू भट्टड, देवेंद्र मेश्राम, अमोल चव्हाण, कोमराव गावक, आलोक चव्हाण यांच्यासह शिवसनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. जवळपास अर्धा तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
कुरखेडा बसस्थानकाचे प्रमुख यांना बसची व्यवस्था करण्याबाबत मागणी केली. विद्यार्थ्यांच्या वेळेवर बस सोडण्यात याव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन सायंकाळी ५.३० वाजता कुरखेडा-कोरची, कुरखेडा-मालेवाडा मार्गासाठी स्वतंत्र बस सोडण्यात यावी, अशी सुद्धा मागणी करण्यात आली. बसस्थानक प्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या वेळेवर बस सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)