कुरखेडा गोदाम हस्तांतरणास वेग
By Admin | Updated: May 25, 2015 01:56 IST2015-05-25T01:56:35+5:302015-05-25T01:56:35+5:30
रबी हंगामातील उन्हाळी धान पिकाचे उत्पादन झाले आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे,

कुरखेडा गोदाम हस्तांतरणास वेग
कुरखेडा : रबी हंगामातील उन्हाळी धान पिकाचे उत्पादन झाले आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे, अशी तक्रार आमदार क्रिष्णा गजबे यांच्याकडे कुरखेडा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली होती. याची दखल घेऊन आमदार क्रिष्णा गजबे यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावून तत्काळ धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले.
प्रलंबित गोदाम हस्तांतरणाच्या कार्यवाहीला वेग आल्यामुळे लवकरच धान खरेदी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आ. गजबे यांना दिली. आ. गजबे यांनी निर्देश दिल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी पुरवठा विभागाकडे रिकामे पडून असलेल्या गोदामाची भाडेतत्वावर मागणी केली. कुरखेडा तालुका मुख्यालयी असलेल्या ५०० टन साठवणूक क्षमतेच्या चार शासकीय गोदामाचे बांधकाम वर्षभरापूर्वी करण्यात आले. मात्र वीज जोडणीअभावी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर गोदामाचे इमारत पुरवठा विभागाकडे हस्तांतरित केली नव्हती. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाला धान साठवणुकसाठी सदर गोदाम देण्याबाबत पुरवठा विभागासमोर अडचण निर्माण झाली होती. सदर बाब आ. क्रिष्णा गजबे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कुरखेडाच्या गोदामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. आमदारांच्या निर्देशानंतर वीज जोडणीचे काम सुरू करण्यात आले असून हस्तांतरणानंतर सदर गोदाम उपलब्ध होणार आहे. साठवणुकीची व्यवस्था होणार असल्याने कुरखेडात लवकरच धान खरेदी सुरू होणार आहे.
यावेळी आमदारासमावेत महामंडळाचे गडचिरोली व्यवस्थापक आंबटकर, नायब तहसीलदार गुंफावार, पं.स. सदस्य चांगदेव फाये, उपविभागीय अभियंता उसेंडी, कुरखेडा येथील आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक मडावी, आलाम, अन्न पुरवठा विभागाचे कमलेश कुंभारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)