‘संदेशवाहक’ मोबाईलमधून जुळताहेत कोवळी हृदयं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:01 IST2021-02-14T05:00:00+5:302021-02-14T05:01:07+5:30
प्रेम म्हणजे मन आणि हृदयाला अतिशय आनंद देणारी कोमल भावना. आवड, आकर्षण, प्रेम वाटले तरी हृदयातल्या नाजूक भावना ओठांवर वा कागदांवर येऊन बाहेर पडणे अशक्यप्राय होते. त्यामुळे मनातल्या भावना जोडीदाराजवळ व्यक्त करणे मोठे जिकरीचे काम असायचे. त्यात अनेक दिवस निघून जात. कधी-कधी तर मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही म्हणून ते प्रेम मनातल्या मनातच राहात असे. आता मात्र मोबाईलने हे काम सोपे केले आहे.

‘संदेशवाहक’ मोबाईलमधून जुळताहेत कोवळी हृदयं
अतुल बुराडे
लाेकमत नूज नेटवर्क
विसोरा : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे अन् आमचे सेम असते’ अशा सोप्या शब्दात कवी प्रेमाचे वर्णन करतात. कालच्या आणि आजच्या पिढीतील हे प्रेम ‘सेम’ असले तरी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र खूप बदलली आहे. आताच्या प्रेमविरांना प्रेम व्यक्त करण्यासाठी १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुद्धा गरज पडत नाही. त्यांचे हे काम मोबाईलने अतिशय सोपे केले आहे. शहरीच नाही तर आता ग्रामीण भागातही त्यामुळे प्रेम व्यक्त करण्याचे आणि कोणत्या कारणावरून बिनसले म्हणून ब्रेकअप होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
प्रेम म्हणजे मन आणि हृदयाला अतिशय आनंद देणारी कोमल भावना. आवड, आकर्षण, प्रेम वाटले तरी हृदयातल्या नाजूक भावना ओठांवर वा कागदांवर येऊन बाहेर पडणे अशक्यप्राय होते. त्यामुळे मनातल्या भावना जोडीदाराजवळ व्यक्त करणे मोठे जिकरीचे काम असायचे. त्यात अनेक दिवस निघून जात. कधी-कधी तर मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही म्हणून ते प्रेम मनातल्या मनातच राहात असे. आता मात्र मोबाईलने हे काम सोपे केले आहे. फोन कॉल करून थेट बोला किंवा एखादा मॅसेज टाका, एवढेच काय प्रेमाचा अंदाज घेण्यासाठी ईमोजी (चिन्ह)चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे सूत जुळवण्यात मोबाईल ‘किंगमेकर’ झाला आहे.
घरातील मंडळी बेखबर
बाहेरच्या जगाचा प्रभाव आता ग्रामीण भागातील मुला-मुलींवरही पडल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही तर अगदी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचेही मोबाईलच्या माध्यमातून सूत जुळून ते घरातील मंडळींची नजर चुकवून ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करताना दिसतात. कुठे जायचे, कधी भेटायचे यापासून तर डोळ्यासमोर पुस्तक पकडून गुपचूपपणे मोबाईलमधून चॅटिंग करणाऱ्या कोवळ्या प्रेमविरांची त्यांच्या घरातील मंडळींनाच खबर नसते. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी त्यांच्यावर योग्य पद्धतीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. त्यांच्या माेबाईलची तपासणी करण्यासाेबतच मित्रमैत्रिणींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
अन् त्यांच्यासाठी मोबाईलच ठरतो खलनायक
२० वर्षांपूर्वी एखाद्यावर प्रेम जडले तर ते व्यक्त करण्यासाठी मित्र-मैत्रीण किंवा कागदाच्या चिठ्ठीचा सहारा घ्यावा लागत होता. आता मानवी संदेशवाहकाची गरजच उरली नाही. त्यांची जागा मोबाईल आणि आता स्मार्टफोनने घेतली. पण अनेकांच्या प्रेमात स्मार्टफोनच खलनायक ठरून प्रेम तुटण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जोडीदार ऑनलाईन होता तर कोणाशी चॅटिंग सुरू होती, मॅसेजला लवकर उत्तर का दिले नाही, फोन व्यस्त हाेता. कोणाशी बोलत होतीस, असे प्रश्न जोडीदाराकडून केले जातात. त्यातून गैरसमज वाढून प्रेमाचा विचका होत आहे.
सामंजस्य कमी, आकर्षण जास्त
आजुबाजुचे वातावरण, टीव्हीवरील मालिका आणि मित्रमैत्रिणींकडून ऐकले जाणारे किस्से यामुळे अल्पवयीन मुलेमुली प्रेमात पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पण त्यांचे हे प्रेम कमी आणि आकर्षणच जास्त असते. त्यामुळे प्रेमातील त्याग, सामंजस्यपणाचा त्यांच्यात अभाव असल्यामुळे अनेकांचे प्रेम अल्पायुषी ठरत आहे.