Korchi taluka taxation tops | कोरची तालुका करवसुलीत अव्वल
कोरची तालुका करवसुलीत अव्वल

ठळक मुद्देशहरालगतच्या ग्रा.पं. माघारल्या : ७२ टक्के गृहकर वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत कोरची तालुक्यातील सर्वच २९ ग्रामपंचायतींनी गृहकर वसुलीत भरीव कामगिरी करीत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची मिळून गृहकर वसुलीची सरासरी टक्केवारी सर्वाधिक ९८.३१ आहे. गृहकर वसुलीत नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ग्रामपंचायतींनीच आघाडी घेतली आहे. याउलट शहरी भागातील ग्रामपंचायती कर वसुलीच्या कामात माघारल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण ४५६ ग्रामपंचायती आहेत. ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायतींनी ९० टक्के वार्षिक गृहकर वसुली करावी, असे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींना दिले होते. शासनाचे तर १०० टक्के गृहकर वसुलीचे प्रशासकीय यंत्रणांना निर्देश आहेत. मात्र ९० टक्केच्या आसपास कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या कमी आहे.
सन २०१८-१९ या वर्षात गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीची जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून २ कोटी ८ लाख ८३ हजार २५१ रुपये गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी १ कोटी ३१ लाख ५६ हजार ४४७ रुपयांची वसुली केली. कर वसुलीची तालुक्याची सरासरी टक्केवारी ६३ आहे. गडचिरोली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची अद्यापही ७७ लाख २६ हजार रुपयांची गृहकर वसुली शिल्लक आहे. आरमोरी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींनी जुनी व चालू वर्षाची मिळून एकूण ९१ लाख १ हजार ३८९ रुपयी कर वसुली केली असून याची टक्केवारी ६२.९६ आहे. देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींनी यंदा ७८ लाख ५ हजार २४१ रुपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी ६१ आहे. कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींनी एकूण ८८ लाख २१ हजार ४२९ रुपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी ७८.९० आहे. कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींनी २६ लाख १५ हजार ८७९ तर धानोरा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींनी ५६ लाख ९१ हजार १९२ रुपयांची गृहकर वसुली केली. धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कर वसुलीची सरासरी टक्केवारी ८८.०७ आहे.
चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीची ३ कोटी २५ हजार ४९३ रुपयांची कर वसुली असून याची टक्केवारी ७६ आहे. मुलचेरा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीने यंदा ४७ लाख ६२ हजार रुपयांची कर वसुली केली. करवसुलीची टक्केवारी ८० आहे. अहेरी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींनी १ कोटी २९ लाख २७ हजार रुपयांची गृहकर वसुली केली असून याची टक्केवारी ७२ आहे.
एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीने ३४ लाख ५९ हजार, सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींनी ५९ लाख ९७ हजार रुपयांची कर वसुली केली आहे. एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कर वसुलीची टक्केवारी ९५.९१ असून हा तालुका कर वसुलीत दुसºया क्रमांकावर आहे.
भामरागड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीची गृहकर वसुलची टक्केवारी ७६ आहे. तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतींनी ४ लाख ३८ हजार रुपये इतकी कर वसुली केली आहे.
चार कोटी मालमत्ताधारकांकडे शिल्लक
बाराही तालुक्यातील ४५६ ग्रामपंचायतीची जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १४ कोटी ६५ लाख ९९ हजार ५६३ रुपये इतकी गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी यंदा ३१ मार्च अखेरपर्यंत १० कोटी ५७ लाख ५१ हजार ३४६ रुपये इतकी कर वसुली केली. अद्यापही गावातील मालमत्ताधारकांकडे ४ कोटी ८ लाख ४८ हजार २१७ रुपये गृहकरापोटी ग्रामपंचायतीचे शिल्लक आहे.


Web Title: Korchi taluka taxation tops
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.