कोंडवाडे जीर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:36 IST2021-04-25T04:36:09+5:302021-04-25T04:36:09+5:30
अहेरी : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, ...

कोंडवाडे जीर्णावस्थेत
अहेरी : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर पूर्णपणे उडून गेले आहे.
वाहतूक समस्या गंभीर
भामरागड : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवाशी भरण्यास बंदी असली, तरी भामरागड येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासगी वाहनांमुळे एसटीला प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे, तसेच वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात
मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नाक्यावर अल्प कर्मचारी
गडचिरोली : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळ्यांमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी हाेत आहे.
भूमीअभिलेखची पदे रिक्त
एटापल्ली : उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहे. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.
निवासस्थान सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने, कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, तसेच वनविभागाचे कर्मचारी तालुका मुख्यालयी राहत आहेत.
रिफिलिंग व्यवस्था सुधारा
देसाईगंज : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र गॅस रिफिलिंगची व्यवस्था मोठ्या गावात दूर अंतरावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोडसेपल्लीत समस्या
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने, पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. गावात मूलभूत साेईसुविधा पुरवून रस्ते व नालीचे बांधकाम करावे.
कचरा अस्ताव्यस्त
आलापल्ली : शहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. उलट काही लोक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा नागरिकांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा
कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे.
आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी
आलापल्ली : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये फवारणी करावी.
झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे.
रुग्णवाहिकेची गरज
कमलापूर : कमलापूर हे गाव अतिसंवेदनशील, दुर्गम भागात असून, या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. येथे ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या सोईसुविधा उपलब्ध नाही. सदर गाव मध्यवर्ती ठिकाण असल्याने रेपनपल्ली, गुंडेरा, जिमलगट्टा यासह विविध परिसरांतील नागरिक उपचारासाठी येतात.
लाइनमनची पदे रिक्त
एटापल्ली : वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर करण्यात आली आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत. वादळ, वारा झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो.