खासगी जागेवर बांधला कोंडवाडा
By Admin | Updated: October 5, 2015 01:50 IST2015-10-05T01:50:18+5:302015-10-05T01:50:18+5:30
तालुक्यातील विसारपूर ग्राम पंचायतीने ५० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या उपाशा गुडप्पा मेडपल्लीवार यांच्या खासगी जागेवर कोंडवाडा बांधून त्यांना बेघर केले आहे.

खासगी जागेवर बांधला कोंडवाडा
विसापूर ग्राम पंचायतीचा प्रताप : मेडपल्लीवार यांचा आंदोलनाचा इशारा
चामोर्शी : तालुक्यातील विसारपूर ग्राम पंचायतीने ५० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या उपाशा गुडप्पा मेडपल्लीवार यांच्या खासगी जागेवर कोंडवाडा बांधून त्यांना बेघर केले आहे. या विरोधात उपोषण करण्याचा इशारा उपाशा मेडपल्लीवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
उपाशा मेडपल्लीवार यांनी सांगितले की त्याचे वडील १९६५ पासून विसापूर येथील आबादी जागेवर घर बांधून वास्तव्याने होते. १९८७ पासून १९९७ पर्यंत त्यांच्या घराचा घरटॅक्स सुरू होता. मात्र २००४ मध्ये घरटॅक्स अचानक बंद करण्यात आला व या जागेचा घरटॅक्स पत्रू फरिदा मडावी यांच्या नावाने सुरू झाला. या विरोधात मेडपल्लीवार यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने २० फेब्रुवारी २००८ रोजी निकाल दिला असून सदर जागा उपाशा मेडपल्लीवार यांचीच असल्याने त्यांना ती परत द्यावी, असा निकाल दिला आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर मडावी यांनी जागेचा ताबा सोडला आहे. मात्र मेडपल्लीवार हा व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेला होता. ग्राम पंचायतने फेब्रुवारी २०१५ मध्ये त्याच्या जागेवर कोंडवाड्याचे बांधकाम केले. याबाबत ग्राम पंचायतीला विचारणा केली असता, गावातून त्याला हाकलून लावण्यात आले. त्याच्या हक्काच्या जागेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व ग्राम पंचायतला घरटॅक्सची नोंद करण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी उपाशा मेडपल्लीवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)