धान खरेदीत कोरची तालुका अव्वल

By Admin | Updated: February 20, 2017 00:35 IST2017-02-20T00:35:55+5:302017-02-20T00:35:55+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने ...

Kochi taluka tops in purchasing paddy | धान खरेदीत कोरची तालुका अव्वल

धान खरेदीत कोरची तालुका अव्वल

कुरखेडा दुसऱ्या स्थानी : जिल्हाभरात ८४ कोटींची खरेदी
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने सन २०१६-१७ या चालू खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ८४ कोटी १९ लाख १४ हजार ६८७ रूपये किमतीच्या ५ लाख ७२ हजार ७३१ क्विंटलची धान खरेदी झाली. यंदाच्या हंगामात कोरची तालुक्यात सर्वाधिक १५ कोटी ५६ लाख ६२ हजार ६२१ रूपये किमतीच्या १ लाख ५ हजार ८९२ क्विंटलची धान खरेदी झाली आहे. धान खरेदीत कुरखेडा तालुका दुसऱ्या स्थानी आहे.
कुरखेडा तालुक्यात आतापर्यंत १५ कोटी ५४ लाख ७३ हजार ६७३ रूपये किमतीच्या १ लाख ५ हजार ७६४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ५८ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी सुरू झालेल्या ५५ केंद्रांवर धानाची आवक झाली. आतापर्यंत ५५ केंद्रांवरून ४ लाख ७ हजार ८८१ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची एकूण किमत ५९ कोटी ९५ लाख ८५ हजार ४०८ रूपये आहे.
गडचिरोली कार्यालयांतर्गत यंदाच्या खरीप हंगामात मंजूर करण्यात आलेल्या सर्वच ३३ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. या केंद्रांवर २४ कोटी २३ लाख २९ हजार २७९ रूपये किमतीच्या १ लाख ६४ हजार ८४९ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून आतापर्यंत एकूण ८८ केंद्रांवरून ५ लाख ७२ हजार ७३१ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धान खरेदीपोटी चुकाऱ्याची रक्कम ८४ कोटी १९ लाख १४ हजार ६८७ रूपये होते. ८८ केंद्र मिळून एकूण १४ हजार १६७ शेतकऱ्यांनी महामंडळांतर्गत असलेल्या सहकारी संस्थांच्या केंद्रांवर धानची विक्री केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात प्रथम क्रमांकावर असलेल्या कोरची तालुक्यात १५ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. यामध्ये मसेली, बेतकाठी, कोरची, बोरी, मर्केकसा, बेडगाव, बोगाटोला, कोटगुल, रामगड, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा, गॅरापत्ती, चरवीदंड व येंगलखेडा आदी केंद्रांचा समावेश आहे. या धान खरेदी केंद्रांवर यंदाच्या खरीप हंगामात २ हजार ३६ आदिवासी शेतकरी व १ हजार ६५७ गैरआदिवासी शेतकरी अशा एकूण ३ हजार ६९३ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. कुरखेडा तालुक्यात आंधळी, कढोली, फरकाडा, सोनसरी, गेवर्धा, नान्ही, शिरपूर, गोठणगाव, पलसगड, कुरखेडा अशी १० खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या १० केंद्रांवर यंदा धानाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. आरमोरी तालुक्यातील १० धान खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत ७७ हजार ९१० क्विंटलची धान खरेदी झाली आहे. या धानाच्या चुकाऱ्याची एकूण रक्कम ११ कोटी ४५ लाख २८ हजार ६५५ रूपये होते.
धानोरा १३ धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ७ कोटी ८३ लाख ८ हजार रूपये किमतीच्या ५३ हजार २७० क्विंटलची धान खरेदी करण्यात आली आहे. घोट परिसरातील १० धान खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत ९ कोटी ५६ लाख १२ हजार ४७५ रूपये किमतीच्या ६५ हजार ४२ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

एकाधिकार योजनेतून दीड कोटींची खरेदी
आदिवासी विकास महामंडळांतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकाधिकार खरेदी योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत सर्व केंद्र महामंडळ स्वत: चालविले. या योजनेतून आतापर्यंत १ कोटी ६३ लाख ४५ हजार ४९४ रूपये किमतीच्या ८ हजार ७९१ क्विंटल धान खरेदी झाली आहे.

२३ कोटी २५ लाखांचे चुकारे प्रलंबित
आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आली. धान विक्री केलेल्या एकूण १४ हजार १६७ शेतकऱ्यांना ६० कोटी ९३ लाख ८९ हजार रूपयांची रक्कम चुकाऱ्यापोटी अदा करण्यात आली. मात्र अद्यापही तब्बल ५ हजार ८४१ शेतकरी धान चुकाऱ्याच्या रक्कमेपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे तब्बल २३ कोटी २५ लाख २५ हजार १८२ रूपये महामंडळाकडे थकीत आहेत. धान चुकारे थांबल्याने सदर शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Web Title: Kochi taluka tops in purchasing paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.