जिल्हा शल्य चिकित्सकांकडून किलनाके यांची पाठराखण

By Admin | Updated: March 6, 2017 00:39 IST2017-03-06T00:39:25+5:302017-03-06T00:39:25+5:30

शमीम सुलताना शेख व ज्योती चंद्रमनी मेश्राम या दोघींचे बाळ डॉ. किलनाके यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावले.

Kiranake's support from district surgeon | जिल्हा शल्य चिकित्सकांकडून किलनाके यांची पाठराखण

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून किलनाके यांची पाठराखण

कारवाईसाठी आंदोलन करणार : मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचा आरोप
गडचिरोली : शमीम सुलताना शेख व ज्योती चंद्रमनी मेश्राम या दोघींचे बाळ डॉ. किलनाके यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावले. या प्रकरणी चौकशी करण्यात आली. मात्र डॉ. किलनाके यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते हे माध्यमांना खोटी माहिती देऊन शासन व लोकांची दिशाभूल करीत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते हे डॉ. किलनाके यांची पाठराखण करीत आहेत, असा गंभीर आरोप मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष महंमद मुस्तफा शेख, सचिव अकील शेख, कोषाध्यक्ष ए. आर. पठाण, सहसचिव हबीब खान पठाण, न.प.चे माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार, सामाजिक कार्यकर्त्या संगीता कात्रटवार तसेच मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या फरजाना शेख आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी मुस्तफा शेख व अकील शेख यांनी सांगितले की, माहितीच्या अधिकारात प्रसुत झालेल्या महिलांची व त्यांच्या बालकांची माहिती आपण मागितली. आपल्याला प्राप्त झालेल्या अहवालानुसार रूग्णालय प्रशासनाने चुकीची माहिती आपल्या रेकार्डमध्ये नमूद केली आहे. तानी विलास मलतानी या महिलेच्या मृतक बाळाचे वजन ११ किलो ६६० ग्रॅम रेकार्डमध्ये दाखविण्यात आले आहे. सदर महिलेची १८ जून २०१६ रोजी प्रसुती झाल्याचे त्यात नमूद आहे. रूग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झालेली माहिती अचूक नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात दोन वर्षात मृत्यू झालेल्या ६०७ बाळांपैकी २५६ बालकांचे वजन हे दोन किलोपेक्षा अधिक आहे, असे रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. पुरेशा प्रमाणात वजन असतानाही संबंधित सुदृढ बालकांचा मृत्यू झालाच कसा असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. डॉ. किलनाके यांच्या सारख्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जन्मताच मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
डॉ. किलनाके यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी व सदर बाळ मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी होण्याकरिता स्थानिक आमदार, खासदार यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे मुस्लीम वेल्फेअर सोसायटीतर्फे लेखी तक्रार करण्यात येईल. आमदारांनी सदर प्रश्नावर विधानसभेत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. येत्या १५ दिवसात डॉ. प्रविण किलनाके यांच्यावर कारवाई न केल्यास आरोग्य विभागाच्या विरोधात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुस्तफा शेख व अकील शेख यांनी यावेळी दिला. डॉ. किलनाके यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या बाळमृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार संचालक, आरोग्य सेवा व राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सोमवारी लेखी स्वरूपात करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

गरोदर मातांचे रक्तदाब अधिक, रक्ताची कमतरता असणे तसेच सिकलसेल रूग्ण असलेल्या मातांचे बाळ गर्भाशयात मृत्यू पावतात. याला उपजात मृत्यू म्हणतात. अशा मृतक बालकांच्या संख्येची माहिती आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठविली आहे. यावर वरिष्ठ स्तरावरून घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत मार्गदर्शन मिळत असते. मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. डॉ. प्रविण किलनाके यांना कोरची येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. शक्य आहे, तेवढी त्यांच्यावर कारवाई केली आहे. आपण डॉ. किलनाके यांची पाठराखण करीत नाही. त्यांचे निलंबन व बदली करण्याचा अधिकार आपणास नाही. बाळ मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे सर्व रिपोर्ट शासनस्तरावर सादर करण्यात आले आहे.
- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली

Web Title: Kiranake's support from district surgeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.