घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:55+5:302021-02-17T04:43:55+5:30

कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. ...

Kingdom of Dirt | घाणीचे साम्राज्य

घाणीचे साम्राज्य

कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र वीजबिल भरला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.

पोटेगाव रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात. परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे.

पोर्ला बसस्थानकावर गतिरोधक उभारा

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.

पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी

गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंदस्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.

खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करा

गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.

काेरचीत विश्रामगृहाची मागणी कायम

कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दूध शीतकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रूपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मात्र या ठिकाणी यंत्रसामग्री आणण्यात आली नाही. मागील दहा वर्षांपासून या इमारतीच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले आहे.

ग्रामीण स्मशानभूमींची दुरवस्था कायम

कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.

दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प

एटापल्ली : तालुक्यातील दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा अनेक दिवसांपासून ठप्प आहे. करोडो रुपये खर्च करून अनेक ठिकाणी बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचे मनोरे उभारण्यात आले. मात्र सदर टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे. या भागातील नागरिकांना इतरांशी संपर्क साधण्यासाठी उंच जागेचा आधार घ्यावा लागत आहे.

कुरखेडातील नळजोडणी तपासा

कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळजोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. कुरखेडा शहरात अनेक ठिकाणी नळ पाइपलाइन लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय हाेत आहे.

प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

कुरखेडा : जिल्ह्यात प्रत्येक गावी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र या प्रवासी निवाऱ्यांकडे एसटी विभाग व शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही निवारे मोडकळीस आले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर थांबून बसची वाट बघतात.

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

अहेरी : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरूपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती करावी, अशी मागणी हाेत आहे.

चालकांवर कारवाई करा

आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतुक पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गौण खनिजांची तस्करी

गडचिरोली : जिल्ह्यात घरबांधकाम व रस्ता बांधकामाला सुरूवात झाली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम व गिट्टीची आवश्यकता भासत आहे. बहुतांश कंत्राटदार परवानगी न घेताच मुरूम व गिट्टीचा उपसा करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परतु महसूल विभाग कुठलीही हालचाल करीत नाही.

वीज चोरीत वाढ

देसाईगंज : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मात्र वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस आकोडा टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार वाढले.

युवक गुंतले सट्टापट्टीत

गडचिरोली : लॉकडाऊननंतर अनेकांच्या हातांना काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यातून काही भागात सट्टापट्टी सुरू आहे. अनेक युवक एजंट म्हणून सट्टापट्टीची वसूली करीत आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे.

Web Title: Kingdom of Dirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.