स्वच्छतेतून गाव निरोगी ठेवा
By Admin | Updated: October 7, 2015 02:27 IST2015-10-07T02:27:24+5:302015-10-07T02:27:24+5:30
गावात स्वच्छता ठेवणे अत्यावश्यक आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिल्यास गावाचा विकास शक्य आहे.

स्वच्छतेतून गाव निरोगी ठेवा
खासदारांचे गावकऱ्यांना आवाहन : तळोधी मो. येथे ग्रामस्वच्छतेवर मार्गदर्शन कार्यक्रम
तळोधी मो. : गावात स्वच्छता ठेवणे अत्यावश्यक आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिल्यास गावाचा विकास शक्य आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी घर, घरासभोवतालचा परिसर व संपूर्ण गावाची स्वच्छता राखावी, जेणेकरून गाव निरोगी राहील, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी गावकऱ्यांना केले.
राष्ट्रीय स्वच्छता मिशन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, चामोर्शीच्या पं.स. सभापती शशी चिळंगे, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, पं.स.चे माजी उपसभापती बंडू चिळंगे, ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी सुरजागडे, उपसरपंच किशोर गटकोजवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कुनघाडकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार नेते म्हणाले, तळोधी मो. गावाच्या विकासासाठी आपण कटीबध्द आहोत. गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावात विकासासाठी पुढाकार घ्यावा, गावकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. असे अभिवचनही खासदार नेते यांनी यावेळी दिले. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार यांनी गावाच्या विकासासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच माधुरी सुरजागडे, संचालन ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले यांनी केले तर आभार विनायक कुनघाडकर यांनी मानले. (वार्ताहर)