उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 02:07 IST2016-11-17T02:07:48+5:302016-11-17T02:07:48+5:30
आगामी नगर पालिका निवडणूक कार्यक्रम राबविताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच उमेदवारांचा खर्च

उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवा
मतदार जागृतीवरही भर : पालिका निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गडचिरोली : आगामी नगर पालिका निवडणूक कार्यक्रम राबविताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच उमेदवारांचा खर्च आणि मतदार जागृती याबाबत सर्वांनी लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मंगळवारी दिल्या.
गडचिरोली आणि देसाईगंज नगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे याबाबत जिल्हा स्तरावर संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची सभा मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवडणुकीसाठीचे मुख्य निरिक्षक तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, गडचिरोली नगर परिषद निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे आदी उपस्थित होते.
या दोन्ही नगरपरिषदांमध्ये या बैठकीपूर्वी राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या बैठका मंगळवारी झाल्या. त्यात राजकीय पक्षांनी कोणत्या बाबींचे पालन करायचे आहे याची त्यांना माहिती देण्यात आली. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना होणाऱ्या गैरप्रकारांबाबत माहिती देता यावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिक ७४४८२८२४७३ या क्रमांकावर व्हाट्सअॅप मार्फत अशी माहिती देऊ शकतात असे नायक यांनी सांगितले.
उमेदवारांना निवडणुकीसाठी नव्याने खाते उघडून त्यामार्फतच सर्व आर्थिक व्यवहार करायचे आहे. हीच पध्दत राजकीय पक्षांनाही लागू आहे. चलन बदलाच्या पार्श्वभूमीवर बँकांमधील गर्दी लक्षात घेता बँकांनी या कामासाठी वेगळेपणाने पुढाकार घ्यावा असेही नायक म्हणाले. वृत्तपत्रातील जाहिरांती तसेच पेडन्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. सर्व मुद्रकांचीही बैठक घेऊन त्यांना निवडणूक नियमावली व मुद्रकांवर असणारी बंधने याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे यावेळी सांगत आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीस अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. बी. एस. तळवी, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे गजानन भोयर आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
भरारी पथक तैनात होणार
गडचिरोली व देसाईगंज पालिकेच्या निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मद्य आणि पैशाचा वापर उमेदवार तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी व्हिडिओ शुटींगसह असणारी प्रत्येकी दोन भरारी पथके सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या. याखेरीज नगर परिषद स्तरावर दोन पथके वेगळी राहणार आहे. या पथकाची नजर २४ तास निवडणुकीच्या प्रचार कार्यावर राहणार आहे.