उमेदवारांच्या प्रचार खर्चावर अंकूश ठेवा
By Admin | Updated: January 17, 2017 00:45 IST2017-01-17T00:45:48+5:302017-01-17T00:45:48+5:30
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

उमेदवारांच्या प्रचार खर्चावर अंकूश ठेवा
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना
गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार खर्चावर नियंत्रण ठेवावे, तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी यांच्या कक्षात सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. सदर बैठकीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप खवले, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच निवडणुकीशी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी निवडणूक विभागाला यावेळी दिले. सदर बैठकीत जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले. संनियंत्रण समिती पुढील विषयावर आराखडा तयार करून योग्य ती कार्यवाही करणार आहे.
यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकण्याकरिता मद्य, पैसा व इतर वस्तू वाटपांवर अंकूश ठेवणे, प्रत्येक उमेदवार व राजकीय पक्ष यांनी खर्चाबाबतची व्यवस्थित माहिती वेळेवर सादर करणे, रोख रक्कमांच्या ने-आण संदर्भात करडी नजर ठेवणे याकरिता सर्व महत्त्वाच्या ठिकाणी जसे रेल्वेस्थानक, बसस्थानक, हॉटेल, फार्म हाऊस यांच्यावर नजर ठेवणे अशा सर्व व्यवहार व हालचालीवर पूर्णत: लक्ष ठेवावे, तारण, वित्तीय हवाला दलाल यांच्यावरही नजर ठेवून बँकामार्फत होणाऱ्या मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणे याशिवाय पेडन्यूज, सोशल कॉमेंट, सोशल मीडिया व इंटरनेट आदी बाबींवर लक्ष ठेवण्याचे काम ही संनियंत्रण समिती करणार आहे, अशी माहिती या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीला निवडणुकीशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)