शापोआ कर्मचाऱ्यांना कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 01:16 IST2016-06-20T01:16:17+5:302016-06-20T01:16:17+5:30
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना व बचत गटांना कायम ठेवून दरमहा १५ हजार रूपये मानधन द्यावे व इतर मागण्या

शापोआ कर्मचाऱ्यांना कायम ठेवा
नागपुरात आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला आयटकचा घेराव
आरमोरी : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना व बचत गटांना कायम ठेवून दरमहा १५ हजार रूपये मानधन द्यावे व इतर मागण्या तत्काळ सोडवाव्या या मागणीसाठी कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील रामगिरी बंगल्याला शनिवारी घेराव घालून आंदोलन करण्यात आले.
मागील १४ वर्षांपासून जि. प. व नगर परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर करीत आहेत. सतत महागाई वाढत असल्याने या कर्मचाऱ्यांनाही वाढीव मानधन मिळणे गरजेचे आहे. मानधनात वाढ व्हावी, याकरिता शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्यांनीही ७ हजार ५०० रूपये मानधन देण्याचे आश्वासन दिले. २६ जानेवारी २०१६ ला प्रजासत्ताक दिनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील निवासस्थानावर मोर्चा काढून मागण्या मांडण्यात आल्या. त्यांनीही केवळ आश्वासन दिले. मात्र मानधन वाढ झाली नाही. त्यामुळे १८ जून रोजी नागपुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी आयटकचे श्यामजी काळे, विनोद झोडगे, माधुरी क्षीरसागर, शिवकुमार गणवीर, बी. के. जाधव, नागपुरे, दास, गिराडे, चलीलवार, गणवीर, राठोड व बहुसंख्य शापोआ कर्मचारी हजर होते. (शहर प्रतिनिधी)