उत्सव शांततेत पार पाडा
By Admin | Updated: August 27, 2014 23:29 IST2014-08-27T23:29:09+5:302014-08-27T23:29:09+5:30
गणेशोत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्ह्यातील मंडळांनी गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस

उत्सव शांततेत पार पाडा
जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक : पोलीस अधीक्षकांचे आवाहन
गडचिरोली : गणेशोत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्ह्यातील मंडळांनी गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक बुधवारी गडचिरोली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. जिल्हास्तरीय शांतता बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे, नगराध्यक्ष निर्मला मडके, मुख्याधिकारी रवींद्र ढाके, गडचिरोलीचे ठाणेदार उमेश बेसरकर, आरमोरीचे ठाणेदार महेंद्र मोरे, देसाईगंजचे ठाणेदार अण्णासाहेब मांजरे, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल खेवले, नामदेवराव गडपल्लीवार, सुरेश पद्मशाली उपस्थित होते. जिल्ह्यात शेकडो गणेश मंडळामार्फत गणेशाची स्थापना केली जाते. उत्सवातील १० दिवस दरम्यान गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी संबंधीत गणेश मंडळाची आहे. रात्रीच्या सुमारास गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात सुव्यवस्था राखावी, असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शांतता बैठकीदरम्यान सांगितले. गणेशाच्या स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंतच्या काळात प्रत्येक गणेश मंडळांनी ध्वनीक्षेपकाची मर्यादा ६० डेसीबलच्या आत ठेवावी, ध्वनीक्षेपकामुळे स्थानिक लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही संदीप पाटील यांनी केले.
शांतता बैठकीला जिल्हाभरातून आलेल्या तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, गाव शांतता समितीचे पदाधिकारी व पोलीस पाटलांनी गणेशोत्सवादरम्यान गावात उद्भवणाऱ्या अनेक समस्या पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या. यावेळी डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, उत्सवादरम्यान गावात होणारी अवैध दारूविक्री, जुगार यासह अनेक समस्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या. गणेशोत्सवादरम्यान गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी गणेश मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला पोलीस अधीक्षकांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रत्युत्तरात दिला. अनुचित प्रकार घडविणाऱ्या मंडळावर १ लाख रूपयाचा दंड व ५ वर्षापर्यंतचा कारावास असल्याची माहिती ठाणेदार उमेश बेसरकर यांनी शांतता बैठकीदरम्यान दिली. प्रास्ताविकातून एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन पवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)