कमलसिंह हिडामी नक्षलवादी नाहीत
By Admin | Updated: August 29, 2015 00:08 IST2015-08-29T00:08:22+5:302015-08-29T00:08:22+5:30
पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले आमचे वडील कमलसिंह हिडामी हे नक्षलवादी नाहीत हो... असा आर्त टाहो कमलसिंहच्या मुलांनी फोडला असून, ...

कमलसिंह हिडामी नक्षलवादी नाहीत
मुलगी व मुलाचा दावा : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार
गडचिरोली : पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले आमचे वडील कमलसिंह हिडामी हे नक्षलवादी नाहीत हो... असा आर्त टाहो कमलसिंहच्या मुलांनी फोडला असून, त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.
मंगळवारी २५ आॅगस्ट रोजी विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षल शोध अभियान राबवीत असताना संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत कमलसिंह हिडामी जखमी झाला. नंतर पोलिसांनीच त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यानंतर कमलसिंह हा एरिया रक्षक दलाचा सदस्य असून, तो बोंडे येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. परंतु आता कमलसिंहच्या मुलांनी आपले वडील नक्षलवादी नव्हते, त्यांचा नक्षल्यांशी कुठलाही संबंध नव्हता, असे निवेदन दिल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.
कमलसिंहचा मुलगा निलाराम हा कोरची येथील आयटीआयमध्ये कारपेंटर ट्रेडचे शिक्षण घेत असून, मुलगी राधिका नवव्या वर्गात शिकत आहे. निलाराम व राधिकाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कोरची तालुक्यातील बोंडे येथील रहिवासी असून, वडील, आई व दोन बहीण-भाऊ असे चार जणांचे कुटुंब आहे. आमचे वडील कमलसिंह हिडामी हे व्यवसायाने बेलदार असून, गेल्या सहा महिन्यांपासून ते मयालघाट येथील पोलीस पाटील कमेनसिंह परसो यांच्या घराचे बांधकाम करीत आहेत. २५ आॅगस्ट रोजी ४ वाजताच्या सुमारास कमलसिंह हिडामी हे मयालघाट येथील काम आटोपून गावाकडे परत येण्यास निघाले असता, वाटेतील जंगलात सी-६० पथकाच्या जवानांनी त्यांच्यावर गोळया झाडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आम्हाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही कोरची पोलीस ठाण्यात गेलो असता, तुमच्या वडिलांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आम्ही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलो. परंतु तेथे तैनात पोलिसांनी आम्हाला आमच्या वडिलांना भेटू दिले नाही. यावरुन पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते, असेही निलाराम व राधिका हिडामी यांनी म्हटले आहे.
आमचे वडील निरपराध असून, ते नक्षल्यांच्या संपर्कात नव्हते. त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर गोळया का झाडल्या, असा सवाल हिडामी भावडांनी केला असून, दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)