काकड आरतीत दंगले भक्तगण
By Admin | Updated: November 1, 2014 22:53 IST2014-11-01T22:53:56+5:302014-11-01T22:53:56+5:30
जिल्हाभर काकड आरती मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या सुमारास प्रत्येक गावात केली जात आहे. आरमोरी येथे राम मंदिर व अहेरी येथे विठ्ठल रूख्माई मंदिरात सदर परंपरा कायम आहे.

काकड आरतीत दंगले भक्तगण
आरमोरी/अहेरी : जिल्हाभर काकड आरती मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या सुमारास प्रत्येक गावात केली जात आहे. आरमोरी येथे राम मंदिर व अहेरी येथे विठ्ठल रूख्माई मंदिरात सदर परंपरा कायम आहे. काकड आरतीचा समारोप कार्तिक पौर्णिमेला होत असल्याने जिल्हाभर भाविक काकड आरतीत भक्तिमय झाले आहेत.
आरमोरी येथील राम मंदिर व विठ्ठल मंदिर येथे १२५ वर्षांपासून काकड आरतीची परंपरा चालू आहे. कोजागिरी पौर्णिमानंतर अश्विन पौर्णिमापासून काकडआरतीला सुरवात होते. यावेळी टाळ, मृदंग, ढोलकीच्या भाविक नामस्मरणात मग्न होतात. त्यानंतर तीर्थप्रसाद देवून काकडआरतीची समाप्ती करतात, कार्तिकी पौर्णिमेला काकडआरतीचा शेवटचा दिवस असतो. यावेळी नदीत घटाचे विसर्जन करण्यात येते व गोपाल काला करून महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो. आरमोरी येथे काकड आरतीच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुभाष खोब्रागडे, विलास जुआरे , मुखरू चौके, मधुकर दहीकार, धाबे महाराज, शामराव दहीकार, अरुण बांते, महेंद्र दहीकार, दिनेश दहीकार, संदीप दहीकार, सतीश दहीकर, कमलाबाई हेमके, प्रिन्स भानारकर, गोपाल दहीकार यांनी १२५ वषार्ची काकडरतीची परंपरा कायम ठेवली आहे .
अहेरी येथील श्री विठ्ठल रूख्माई मंदिरात मागील ३६ वर्षापासून काकड आरतीची परंपरा कायम आहे. ६ नोव्हेंबरला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९७९ मध्ये सत्यनारायण नामेवार यांच्या नेतृत्वात नवयुवक मंडळातर्फे काकड आरतीची परंपरा सुरू करण्यात आली. दरवर्षी काकड आरतीची सुरूवात आश्विन शुद्ध पौर्णिमेला होते. यावर्षी श्री विवाह सोहळ्याच्या कंकणधारकाचा मान लंच्छना गद्देवार यांनी स्वीकारला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)