चंद्रपूरकरांच्या कपडा बँकेने दिली कारसपल्लीवासीयांना ऊब
By Admin | Updated: January 10, 2017 00:56 IST2017-01-10T00:56:00+5:302017-01-10T00:56:00+5:30
चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव शरद राजने यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वत:ला सामाजिक कामात झोकून घेतले.

चंद्रपूरकरांच्या कपडा बँकेने दिली कारसपल्लीवासीयांना ऊब
खामगाववरूनही मदत : गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळाळला
भामरागड : चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव शरद राजने यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वत:ला सामाजिक कामात झोकून घेतले. त्यातूनच सुमती कपडा बँकेची निर्मिती झाली. या कपडा बँकेच्या माध्यमातून शरद राजने व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी भामरागड तालुक्यातील कारसपल्ली गावात शेकडो नागरिकांना कपड्याचे वाटप केले. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव झळाळलेला होता.
भामरागड हा राज्यातील सर्वात मागास तालुका, या भागात अजूनही विकासाची प्रक्रिया पोहोचलेली नाही. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत कारसपल्ली गावात कपडे वाटप करायचे निश्चित करण्यात आले. चंद्रपूर येथील तुकूम परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते शरद राजने यांनी या कामात पुढाकार घेतला. त्यांनी काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या सुमती कपडा बँकेत मोठ्या प्रमाणावर कपडे जमा झाले होते. या कपड्यातील वापरण्यायोग्य कपडे निवडून त्यांनी ते कारसपल्ली व कारसपल्ली टोला या गावातील १०० नागरिकांना वाटले.
यावेळी महिलांना साडी, पुरूषांना शर्ट, पॅन्ट, लहान मुलांना फ्रॉक व कपडे तसेच जर्किन व स्वेटरही वितरित करण्यात आले. सदर कापड चंद्रपूर येथील सुधाकर कस्तुरे, गुलाबराव खंडाळे, अॅड. प्रकाश गजबे, वसंत उपरे, घनश्याम वनकर, राज तिवारी, मुकंद आंबेकर, आशिष धोटे, प्रशांत रणदिवे यांच्या माध्यमातून तुकूम, ऊर्जानगर वसाहत व अन्य भागातून जमा करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथूनही या कपडा बँकेला कपडे प्राप्त झालेत. त्यानंतर कपडे वाटपाचा छोटेखानी समारंभ सुमती कपडा बँकेचे अध्यक्ष व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव शरद राजने, सहायक निबंधक प्रशांत धोटे, बुर्रेवार, अहेरीच्या हेल्पिंग हॅन्डस् संघटनेचे अध्यक्ष प्रतिक मुधोळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
पुढील महिन्यातही आणखी एक कार्यक्रम याच भागात घेतला जाणार असल्याची माहिती शरद राजने यांनी याप्रसंगी दिली. यावेळी सुमती कपडा बँकेचे अध्यक्ष सुमती कपडा बँकेचे कारसपल्लीवासीयांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)