अडपल्ली परिसरातील जंगलाला आग
By Admin | Updated: April 9, 2017 01:35 IST2017-04-09T01:35:02+5:302017-04-09T01:35:02+5:30
कोनसरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अडपल्ली-गुंडापल्ली मार्गावरील जंगलाला शुक्रवारी

अडपल्ली परिसरातील जंगलाला आग
वन विकास महामंडळाचे दुर्लक्ष : भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातही वणवा
गडचिरोली : कोनसरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अडपल्ली-गुंडापल्ली मार्गावरील जंगलाला शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे.
कोनसरी वन परिक्षेत्रातील १७२, १७५, १८८ क्रमांकाच्या कंपार्टमेंटला दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास अर्धा किमी परिसरातील जंगल जळून खाक झाले. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विकास महामंडळाला दिली. मात्र याकडे वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सायंकाळपर्यंत वनवा सुरूच होता. त्याचबरोबर मार्कंडा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१५ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्येही आग लागली. या आगीतही कोट्यवधी रूपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. गट्टा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोठी परिसरातही जंगलाला आग लागली.
ऊन कडक होत चालल्याने जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच दक्ष असणे आवश्यक आहे. वनवा नियंत्रणात आणण्याबरोबरच वनवा लागू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाने वन विभागाला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र वन विभागातर्फे सदर निधी केवळ कागदोपत्री खर्ची केला जातो. पाहिजे त्या प्रमाणात वनवा नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने वनवे लागण्याचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वनव्याची माहिती देऊनही वनकर्मचारी वेळेवर पोहोचत नसल्याची दयनीय स्थिती आहे. याकडे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)