भाडभिडी-हळदवाही मार्गावरील प्रवास खडतर
By Admin | Updated: February 6, 2017 01:36 IST2017-02-06T01:36:05+5:302017-02-06T01:36:05+5:30
चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी-हळदवाही या तीन किमीच्या मार्गाचा प्रवास प्रचंड खडतर झाला आहे.

भाडभिडी-हळदवाही मार्गावरील प्रवास खडतर
खड्ड्यांचे साम्राज्य : डांबरी मार्गाचे खडीकरणात झाले रूपांतर
भाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी-हळदवाही या तीन किमीच्या मार्गाचा प्रवास प्रचंड खडतर झाला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गाची दुरूस्ती करण्या न आल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
चामोर्शी-भाडभिडी हळदवाही मार्ग पुढे रेगडीपर्यंत जातो. सदर मार्गाने हळदवाही-रेगडी परिसरातील सुमारे ५० गावातील नागरिक प्रवास करीत आहेत. दररोज काळी-पिवळी वाहने धावतात. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या सहा बसफेऱ्या याच मार्गे आवागमन करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात सदर मार्गावर वाहनाची वर्दळ राहते. खड्ड्यांमुळे या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरची गिट्टी पूर्णत: उखडली असून डांबरीकरणाचा हा मार्ग आता खडीकरणात रूपांतरीत झाला आहे.
या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण मागील १५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही सदर मार्गाची पक्की दुरूस्ती व डागडुजी करण्यात आली नाही. पावसाळ्यात तर या मार्गावर एक फुटापर्यंत पाणी साचून राहते. मागील वर्षीच्या पावसाळ्या या मार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आले. मात्र अल्पावधीतच मुरूम उखडला असून मार्ग पुन्हा जैसे थे झाला. या भागातील नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही संबंधित प्रशासनाने या मार्गाची दुरूस्ती केली नाही.