100 किमीच्या प्रवासासाठी लागतात तब्बल चार तास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:35+5:30
चार वर्षांपूर्वी आलापल्ली ते सिरोंचा मार्गाची नव्याने बांधणी झाली. पण गेल्या दोन वर्षात झालेला अतिपाऊस आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. आजारी नागरिक आणि गरोदर माता यांच्यासाठी या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. सध्या महामार्ग प्राधीकरणाने या मार्गाची डागडुजी सुरू केली असली तरी या महामार्गाची पुनर्बांधणी करणे गरजेचे झाले आहे.

100 किमीच्या प्रवासासाठी लागतात तब्बल चार तास !
विवेक बेझलवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्ह्यात सध्या सर्वाधिक खराब आणि चर्चेचा विषय झालेला रस्ता म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा हा आहे. या मार्गावरून जाताना हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे असे कोणाला सांगितले तर विश्वास बसणे कठीण आहे. या १०० किलोमीटरच्या मार्गात आता रस्ता कमी आणि खड्डेच जास्त असल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा हे जेमतेम दोन ते अडीच तासाचे अंतर पार करण्यासाठी सध्या ४ तास लागत आहेत.
चार वर्षांपूर्वी आलापल्ली ते सिरोंचा मार्गाची नव्याने बांधणी झाली. पण गेल्या दोन वर्षात झालेला अतिपाऊस आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. आजारी नागरिक आणि गरोदर माता यांच्यासाठी या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.
सध्या महामार्ग प्राधीकरणाने या मार्गाची डागडुजी सुरू केली असली तरी या महामार्गाची पुनर्बांधणी करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी येत असलेल्या विविध अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सर्व लाेकप्रतिनिधींनी सरकारदरबारी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आलापल्लीनंतर मोसमपासून पुढे ३५ किमी मार्गाच्या रुंदीकरण व पुनर्बांधणीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यापुढे सिरोंचापर्यंतच्या कामासाठीही प्रस्ताव गेला आहे. पण वन कायद्याच्या अडचणींमुळे हे काम सुरू झालेले नाही. या अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- सारंग गोगटे, सहायक अभियंता, महामार्ग प्राधीकरण आलापल्ली
अवजड वाहनांचा प्रवास
आलापल्ली-सिरोंचा मार्गावर छत्तीसगड आणि तेलंगाना राज्यासाठी तीन आंतरराज्यीय पूल निर्माण झाल्याने दक्षिणेकडून येणारी अवजड वाहने टोल टॅक्स वाचवण्यासाठी याच मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
पर्यटकांच्या भेटी मंदावल्या
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलंगणातील कालेश्वर मंदिरात भाविकांची वर्षभर वर्दळ असते, परंतु महामार्गाच्या दुरवस्थेमुळे भाविकांसह कमलापूर हत्ती कॅम्प, गिधाडांच्या विणीचे ठिकाण, सिरोंचाचे ब्रिटिशकालीन विश्रामगृह, वडधम जीवाष्म पार्क, सोमनूर संगमला येणारे पर्यटक ९० टक्क्यांनी कमी झाले.