जोगीसाखराचा बंधारा कुचकामी
By Admin | Updated: July 30, 2015 01:16 IST2015-07-30T01:16:50+5:302015-07-30T01:16:50+5:30
जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील नाल्यावर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले.

जोगीसाखराचा बंधारा कुचकामी
मोटार पळविली : सेक्शन पाईप लिक झाल्याने बंधाऱ्याचे पाणी मोटारपर्यंत पोहोचले नाही
जोगीसाखरा : जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील नाल्यावर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले. मात्र त्या बंधाऱ्यावरील मोटार चोरट्यांनी लंपास केली आहे. तसेच तत्कालीन अभियंत्यांच्या सदोष कार्यपध्दतीमुळे शासनाची कोल्हापुरी बंधारे बांधण्याची योजना पूर्णत: फसली असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागाच्या वडसा यंत्रणेमार्फत सन १९९४-९५ मध्ये खासदार निधीतून जोगीसाखरा येथील नाल्यावर सिमेंट काँक्रीटचे कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. प्रत्येक बंधाऱ्याच्या माध्यमातून सभोवतालची २५ हेक्टर पेक्षा अधिक शेतजमीन बारमाही सिंचनाखाली आणून पाण्याची भूजल पातळी वाढविणे तसेच सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान जि.प. सिंचाईच्या वडसा उपविभागामार्फत बंधाऱ्यांच्या कामांमध्ये ५० फूट खोल विहीर खोदण्यात आली. त्यात इनवेल जॅकवेल त्यावर सात अश्वशक्तीच्या दोन मोटारी, पाणी पुरवठा टाकी, पाईपलाईन आदींचे काम करण्यात आले. मात्र सिंचाई विभागाच्या तत्कालीन अभियंत्याच्या सदोष कार्यप्रणालीमुळे इनवेल ते मोटारपर्यंत टाकण्यात आलेला सेक्शन पाईप लिक असल्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी मोटारपर्यंत कधीच पोहोचले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधाऱ्याचा एक थेंबही पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचला नाही.
महिनाभरापूर्वी जोगीसाखरा येथील बंधाऱ्यातील जॅकवेलमध्ये सुरक्षित असलेल्या सात अश्वशक्तीच्या दोन मोटारी चोरीला गेल्या. (वार्ताहर)
बंधाऱ्याचा शेतकऱ्याना कवडीचाही फायदा नाही
सततची नापिकी व दुष्काळामुळे जोगीसाखरा भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी, यासाठी जि.प.च्या लघु सिंचाई विभागामार्फत जोगीसाखरा येथील नाल्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करण्यात आले. मात्र सदर बांधकाम योग्यरित्या करण्यात न आल्याने तसेच सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या भागातील एकाही शेतकऱ्याला कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेचा लाभ आजतागायत झाला नाही, हे विशेष.