झाडिया जिल्हा कचेरीवर धडकले
By Admin | Updated: December 19, 2015 01:20 IST2015-12-19T01:20:38+5:302015-12-19T01:20:38+5:30
झाड्या, झाडिया, झाडे, झाडेगोंड, झारे, झारिया, जाडी, झाडी, झारेया आदी नावाने गडचिरोली, चंद्रपूर व छत्तीसगडच्या काही भागात वास्तव्यास असलेल्या...

झाडिया जिल्हा कचेरीवर धडकले
निवेदन सादर : तीन हजारांहून अधिक आंदोलकांचा सहभाग
गडचिरोली : झाड्या, झाडिया, झाडे, झाडेगोंड, झारे, झारिया, जाडी, झाडी, झारेया आदी नावाने गडचिरोली, चंद्रपूर व छत्तीसगडच्या काही भागात वास्तव्यास असलेल्या या जमातीचे अध्ययन करून राज्य घटनेच्या सूचीमध्ये समावेश करावा यासह इतर मागण्यांसाठी हजारो झाडिया समाजाचे नागरिक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. स्थानिक इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात जवळपास तीन हजार नागरिक सहभागी झाले होते.
भाषा व प्रदेशानुसार अपभ्रंश झाल्याने या समाजाला झाडिया, झाड्या, झाडे, झाडेगोंड, झारे, झारीया आदी नावाने संबोंधले जाते. या समाजाच्या नावावरूनच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याच्या भूभागाला झाडीपट्टी, झाडीमंडल असे संबोधले जाते. यावरून झाडिया समाज हा मूल निवासी असल्याचे सिध्द होते. सदर समाज चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, गडचिरोली तहसीलमध्ये वास्तव्यास आहे. त्याचबरोबर छत्तीसगड राज्यातील भोपालपटन्म, बिजापूर, सुकमा, मद्देड, सांड्रा, दंतेवाडा या परिसरामध्येसुध्दा या जमातीचे वास्तव्य असल्याचे दिसून येते. या समाजाच्या परंपरा आदिवासी समाजाप्रमाणे आहेत. मात्र या जमातीचा अजुनपर्यंत अभ्यास करण्यात आला नाही. त्यामुळे या जमातीचा राज्य घटनेच्या कोणत्याच सूचीमध्ये उल्लेख नाही. या जमातीचा अभ्यास करून अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, केंद्र व राज्य शासनाने पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात विशेष प्राधान्य द्यावे, या जमातीचा कोणत्याच सूचीमध्ये का समावेश करण्यात आला नाही. याबाबत श्वेतपत्र दाखल करावे, गोंडवाना विद्यापीठ व विश्व विद्यालयाद्वारे या जमातीचे अध्ययन करावे, या जमातीच्या विकासासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून स्वतंत्र निर्णय घ्यावा आदी मागण्यांसाठी इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. सुशील कोहाड यांच्यासह चंद्रपूर-गडचिरोली झाड्या किंवा झाडीया जमात समितीचे अध्यक्ष अनिल मंटकवार, जिल्हा सचिव जयेंद्र बर्लावार, उपाध्यक्ष यमाजी तुन्कलवार यांनी केले. मोर्चात जवळपास तीन हजार नागरिक सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)