जपानने घेतली संतोषीच्या यशाची दखल
By Admin | Updated: March 6, 2016 01:01 IST2016-03-06T01:01:01+5:302016-03-06T01:01:01+5:30
साकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ सायन्स ही जपान शासनाची योजना आहे. या योजनेनुसार इन्स्पायर अवॉर्ड या राष्ट्रीय ...

जपानने घेतली संतोषीच्या यशाची दखल
दुधाची क्षमता वाढविण्यावर प्रयोग : राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पुरस्कार
चामोर्शी : साकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ सायन्स ही जपान शासनाची योजना आहे. या योजनेनुसार इन्स्पायर अवॉर्ड या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना जपान देशाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून चामोर्शी येथील संतोषी संजय कुनघाडकर हिची जपान देशाच्या आठ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
संतोषी कुनघाडकर ही मूळची चामोर्शी येथील रहिवासी आहे. ती जनता विद्यालय पोंभुर्णा येथे २०११-१२ मध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असताना व्यंकटस्वामी चलाख यांच्या दुधाची क्षमता वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताचा पुरवठा करणे, चहा, कॉफीला पर्याय शोधणे, भेसळ ओळखणे याकरिता तरोटा या वनस्पतीवर प्रक्रिया करून अनेक अपायकारक घटक वेगळे करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. तिच्या या संशोधनास जिल्हा, राज्य व नंतर नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्य पुरस्कृत प्रथम क्रमांक मिळाला होता. तिच्या संशोधनाबद्दल नवी दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. या यशाबद्दल संतोषीची ७ मे ते १४ मे २०१६ या आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
या दौऱ्यात भारतातील एकूण ३० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. (शहर प्रतिनिधी)