जामर लावण्याची कारवाई जोमात
By Admin | Updated: March 2, 2016 01:51 IST2016-03-02T01:51:43+5:302016-03-02T01:51:43+5:30
स्थानिक इंदिरा गांधी चौकात मुख्य रस्त्याच्या बाजुला नो-पार्र्किं ग क्षेत्रात उभी केली जाणाऱ्या वाहनांविरोधात गडचिरोली शहर ....

जामर लावण्याची कारवाई जोमात
गडचिरोली वाहतूक पोलिसांची मोहीम : मंगळवारी २० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकात मुख्य रस्त्याच्या बाजुला नो-पार्र्किं ग क्षेत्रात उभी केली जाणाऱ्या वाहनांविरोधात गडचिरोली शहर वाहतूक पोलीस शाखेने जोरदार मोहीम उघडली असून मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २० पेक्षा अधिक वाहनांना जामर लावण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे इंदिरा गांधी चौकातील नो-पार्र्किंग क्षेत्रातील वाहने गायब झाली होती.
चारही मुख्य मार्ग स्थानिक इंदिरा गांधी चौकात एकत्र येतात. त्यामुळे या चौकात पहाटेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी राहते. या ठिकाणी चारही मार्गावर पानटपऱ्या, चहाटपऱ्या, नाश्त्याची दुकाने लावण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी विशेष करून तरूणांची गर्दी वाढते.
इंदिरा गांधी चौकाच्या जवळपास कुठेही पार्र्किं गची व्यवस्था नाही. त्यामुळे युवक वर्ग पानटपऱ्यांच्या समोर रस्त्याच्या बाजुला वाहने उभी करतात. वाहनधारकांना वाहने उभी करण्यासाठी या ठिकाणावरून लाईनही आखण्यात आली आहे. मात्र काही वाहनधारक या लाईनच्या बाहेर वाहने उभी करतात. वाहनांची गर्दी एवढी वाढते की, अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने उभी केली जातात. वाहतुकीस अडथळा होत असल्याने या लाईनच्या बाहेर वाहने ठेऊ नये याबाबतच्या सूचना अनेकवेळा वाहतूक पोलीस वाहनधारकांना देतात. मात्र वाहनधारक माणण्यास तयार होत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होऊन लहान-मोठे अपघातही घडतात.
वाहनधारकांना वठणीवर आणण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी मागील काही दिवसांपासून कडक पाऊल उचलले आहे. वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी पोहोचल्यानंतर वाहनधारक त्या ठिकाणी राहत नाही. त्यामुळे कारवाई करण्यास अडचण निर्माण होते. त्याचबरोबर अनेक वाहनधारक वाहतूक पोलीस वाहनाजवळ दिसताच पसार होतात. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनांना जामर लावण्याची कारवाई सुरू केली आहे. जामर हा एक प्रकारचा कुलूप आहे. जामर लावल्यानंतर संबंधित वाहनधारकाला वाहतूक पोलिसांकडे गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. मंगळवारी वाहतूक पोलिसांनी जामर लावण्याची कारवाई सकाळपासूनच सुरुवात केली. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत २० पेक्षा अधिक वाहनांना जामर लावून कारवाई केली. या कारवाईमुळे वाहनधारकांनी धास्ती घेत रस्त्याच्या बाजुला वाहने उभी ठेवली नाही. (नगर प्रतिनिधी)