आयटक संघटनेच्यावतीने गडचिरोलीत जेलभरो
By Admin | Updated: August 10, 2016 01:37 IST2016-08-10T01:37:16+5:302016-08-10T01:37:16+5:30
आयटक संघटनेच्या वतीने असंघटीत कामगार, शेतकरी, हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगार तसेच अंगणवाडी महिला कर्मचारी...

आयटक संघटनेच्यावतीने गडचिरोलीत जेलभरो
शेकडोंची उपस्थिती : अंगणवाडी महिला व हातपंप दुरूस्ती कामगार सहभागी
गडचिरोली : आयटक संघटनेच्या वतीने असंघटीत कामगार, शेतकरी, हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगार तसेच अंगणवाडी महिला कर्मचारी यांच्या विविध मागण्यांना घेऊन मंगळवारी क्रांतीदिनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व हातपंप देखभाल दुरूस्ती व कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार, कार्याध्यक्ष अॅड. जगदिश मेश्राम, माजी जि.प. सदस्य अमोल मारकवार, आयटकचे अध्यक्ष देवराव चवळे, जलीलखॉ पठाण, विनोद झोडगे, चंद्रभान मेश्राम, प्रकाश ठलाल आदींनी केले.
यावेळी आंदोलनाकांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात मागील दोन वर्षात आपण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासन पूर्ण झाली नाही. जुन्या काँग्रेस प्रणित आघाडी सरकारच्या काळात असलेल्या धोरणांचीच दुप्पट गतीने अंमलबजावणी केली जात आहे, असा आरोप आयटकने केला आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढत असून ती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, रोजगार निर्माणासाठी पाऊल उचलण्यात यावे, कायम बारमाही कामाचे कंत्राटीकरण बंद करावे, कंत्राटी कामगारांना कायम कामगाराचे वेतन, सेवा शर्ती लागू करण्यात याव्या आदीसह १२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच हातपंप देखभाल दुरूस्ती कामगार संघटनेच्या वतीनेही हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगारांना जि.प.मध्ये शासकीय सेवेत सामावून घ्यावे, बेकायदेशीर अटी व शर्तीवर आधारीत करारनामा रद्द करण्यात यावा, वाढत्या महागाईनुसार २० ते २२ हजार रूपये मानधन देण्यात यावे, जे कामगार वयोवृध्द आहेत, अशा कुटुंबातील एक सदस्य जि.प.मध्ये कामगार म्हणून घेण्यात यावा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगारांना रजा लागू करण्यात यावी, जिल्ह्यात रिक्त असलेल्या यांत्रिकी व मदतनिस पदावर ट्रायसेम यांत्रिकांना प्राधान्य देऊन पदभरती करण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे हातपंप कामगारांनासुध्दा १५ टक्के नक्षल प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाला जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)