तलावात पोहोचली मगर !

By Admin | Updated: October 18, 2014 01:31 IST2014-10-18T01:31:29+5:302014-10-18T01:31:29+5:30

येथील गोरजाई मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या महादेव तलावात मागील काही दिवसांपासून मगराचे वास्तव्य आहे.

But it reached the pond! | तलावात पोहोचली मगर !

तलावात पोहोचली मगर !

वैरागड : येथील गोरजाई मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या महादेव तलावात मागील काही दिवसांपासून मगराचे वास्तव्य आहे. सदर मगर पुराच्या पाण्याने पावसाळ्यात या तलावात पोहोचली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मगराच्या वास्तव्यामुळे येथील मासेमार व नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत.
वैरागड येथील महादेव तलावातील मगर दररोज सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास तलावाच्या काठावर येत असल्याने या ठिकाणी मगराला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. वैरागड येथील मच्छीपालन संस्था या तलावाचा लिलाव दरवर्षी खरेदी करते. या तलावात मत्स्य बीज टाकून डिसेंबर, जानेवारी महिन्यात या तलावात मासेमारी केली जाते. मात्र मागील काही दिवसांपासून या तलावात मगराचे वास्तव्य आढळून येत असल्याने एकही मासेमार मासेमारी करण्यासाठी तलावात उतरत नसल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसापूर्वी मासेमारी करणाऱ्या ढिवर समाज बांधवांना महादेव तलावात मगर असल्याचे निदर्शनास आले. सदर बातमी गावात पोहोचताच गावातील नागरिकांनी मगराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. महादेव तलावात मगर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. सध्या वन विभाग या मगरावर लक्ष ठेवून आहे. सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी बी. एन. चिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वैरागड येथील महादेव तलावात मगराचे वास्तव्य असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी यांना नागरिकांकडून मिळाली. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सदर माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहोचविली आहे.
वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी या महादेव तलावात मगर असल्याची माहिती नागपूरच्या वन्यजीव संरक्षण विभागाला दिली आहे. जोपर्यंत वन्यजीव विभागाकडून लेखी सूचना येत नाही, तोपर्यंत या मगरासंदर्भात कोणतीही उपाययोजना केली जाणार नाही. काही दिवसात वन्यजीव विभागाची चमू वैरागडात दाखल होणार आहे. सदर चमू पोहोचल्यानंतर महादेव तलावातील पाण्याच्या पात्रात असलेल्या मगराला सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे, अशी माहिती वडसा वनविभागाने दिली आहे.
यंदाच्या पावसाळ्याच्या दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्यात पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने महादेव तलावात मगर पोहोचले असावे, असा अंदाज जाणकार करीत आहेत.

Web Title: But it reached the pond!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.