कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे

By Admin | Updated: July 2, 2017 02:04 IST2017-07-02T02:04:43+5:302017-07-02T02:04:43+5:30

पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून या जिल्ह्याच्या समस्या माहित आहेत. समस्या आणि प्रश्न हे कधीच संपत नाहीत.

It is my strength to work activists | कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे

कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे

अशोक नेते : भाजप आणि लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून या जिल्ह्याच्या समस्या माहित आहेत. समस्या आणि प्रश्न हे कधीच संपत नाहीत. पण महत्वाचे प्रश्न सुटले पाहीजे यासाठी सातत्याने मी प्रयत्न करीत आहे. त्यात बऱ्याच प्रमाणात यश येऊन अनेक कामे मार्गी लागले आहेत. माझ्या या यशामागे खरी ताकद माझ्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे माझा सत्कार हा त्यांचाच सत्कार आहे, असे भावोद्गार जिल्ह्याचे खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले.
येथील आरमोरी मार्गावरील एका सभागृहात शनिवारी त्यांचा भाजप आणि लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबूराव कोहळे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, न.प.चे महिला व बांधकाम सभापती अलका पोहणकर, वैष्णवी नैताम, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, पाणी पुरवठा सभापती निंबोड आदींसह भाजपचे पदाधिकारी मंचावर विराजमान होते.
याप्रसंगी बोलताना खा.नेते म्हणाले, जिल्ह्यात खनिज संपत्ती भरपूर असतानाही उद्योगधंदे नसल्यामुळे हाताला काम नाही. सिंचन सुविधा अपुऱ्या आहेत. पाण्याचा साठा भरपूर असूनही त्याचा वापर करता येत नाही. मामा तलावांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम आणखी बरेच करावे लागणार आहे. ती कामे सुरू आहेत. औद्योगिक विकासासाठी रेल्वे लाईन गडचिरोलीपर्यंत आणण्यासाठी मंजुरी मिळवून आणली. ७ राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळविली आहे. १७ पुलांचे काम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अरविंद पोरेड्डीवार यांनी आपल्या भाषणात माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे, असे सांगून खा. नेते हे प्रवाहाविरूद्ध पोहणाऱ्यांपैकी एक असल्याचे सांगितले. कोहळे यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना खा.नेते यांनी आपले अस्तित्व निर्माण केल्याचे प्रसंशोद्गार काढले. आ.गजबे व इतरही पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आमदार डॉ.देवराव होळी यांनी तर कार्यक्रमाचे संचालन रविंद्र ओलालवार यांनी केले.
यावेळी खा.नेते यांचा मोठ्या पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह त्यांच्या मतदार संघातील गोंदिया व चंद्रपूर मतदार संघातील अनेक लोक आले होते. कार्यक्रमाला नगरसेवक निता उंदीरवाडे, पुजा बोभाटे, नितू कोलते, वर्षा नैताम, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, मुक्तेश्वर काटवे, विलास नैताम, प्रशांत वागरे, वर्षा बट्टे, भुपेश कुडमेथे, संजय मेश्राम, माधुरी खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

आरोग्य तपासणी व रक्तदान
खा.नेते यांच्या सत्कारस्थळी सकाळपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात १३५२ जणांची तपासणी करण्यात आली. १२० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. १५३ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. ९ जणांनी रक्तदान केले. २० जणांची व्हीलचेअर देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

 

Web Title: It is my strength to work activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.