थकीत वीज देयकाचा मुद्दा गाजला
By Admin | Updated: May 17, 2015 02:15 IST2015-05-17T02:15:39+5:302015-05-17T02:15:39+5:30
आरमोरील तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली.

थकीत वीज देयकाचा मुद्दा गाजला
वैरागड : आरमोरील तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली. सदर ग्रामसभेत अंगणवाडी विद्युतीकरणावर झालेला अवाढव्य खर्च थकीत वीज देयकांमुळे गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याचा मुद्दा चांगलाच गाजला.
सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात वैरागड ग्रामपंचायतीने पाटणवाडा, मेंढेबाडी येथील प्रत्येकी एक व वैरागड येथील सहा अशा एकूण आठ अंगणवाडी केंद्राच्या इमारतीला विद्युत जोडणी केली. यावर ग्रा.पं.ने मागास क्षेत्र अनुदान निधीतून दीड लाखांचा खर्च केला. मात्र अंगणवाडी केंद्राचा थकीत विद्युत देयक न भरल्यामुळे महावितरणने या अंगणवाडी केंद्राचा वीज पुरवठा खंडीत केला. गावातील पाणी टंचाईचा मुद्यावर या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली. काही वार्डात अनावश्यक पाणी पुरवठा होतो. अनेक नागरिक आपल्या घरातील नळा टिल्लूपंप लावून मोठ्या प्रमाणात पाणी खेचतात. परिणामी अनेक नागरिकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे ग्रा.पं.ने मोहीम राबवून तत्काळ टिल्लूपंप लावणाऱ्यावर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी सभेत करण्यात आली.
गावातील पांदनरस्ते, अपंगांचा तीन टक्के निधी, जन्माची नोंद प्रमाणपत्र, ग्रा.पं. भवनाची इमारत, लुथे यांच्या शेतानजीकच्या पांदन रस्त्यावरील पूल निर्मितीच्या प्रश्नावरही ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)