लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनेक शाळांच्या वार्षिक परीक्षा सध्या सुरू असून विविध कारणास्तव पुढील वर्षी शाळा बदलण्यासाठी तसेच पाल्यांना नव्याने शाळेत प्रवेशित करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. परंतु, नवीन शाळेत प्रवेश घेताना पाल्यांचे नुकसान टाळण्यासाठी पालकांनी शाळेसंबंधी काही कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून पालकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू असून अनेकांना शाळा बदलायच्या आहेत, तर काहींना नव्याने प्रवेश घ्यायचे आहेत. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा नव्याने प्रवेश घेत असताना अनेक प्रलोभने मिळण्याची शक्यता असते. त्यावेळी प्रत्येक बाब पडताळूनच पाहावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यकच आहे. विविध कारणास्तव दरवर्षी शाळा बदलण्याचे तसेच पाल्यांना नव्याने प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी जास्त असते. शहरासह जिल्ह्यात बेकायदा शाळांची दरवर्षी यादी जाहीर केली जाते.
शाळांवर कारवाईची होतेय मागणीनियमबाह्य सुरू करण्यात आलेल्या शाळांमुळे नुकसान होते. त्यामुळे बोगस शाळा चालकांवर कडक कारवाई करावी, जेणेकरून बेकायदा शाळा सुरू होणार नाही, अशी मागणी होत आहे.
घर घेताना कागदपत्रे पाहता; शाळांचे का नाही ?घर घेताना फसवणूक टाळण्यासाठी कागदपत्रे तपासून घेतली जातात. अनेकदा यासाठी वकिलांचा सल्ला घेतला जातो; परंतु शाळेत कागदपत्रे न तपासता प्रवेश घेतले जातात.
मुलांचे प्रवेश घेण्यापूर्वी या कागदपत्रांची विचारणा करा
- ना हरकत प्रमाणपत्र : शाळांना 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळाले आहे का? त्याची पालकांनी विचारणा करणे आवश्यक आहे.
- मंडळाचे मान्यतापत्र: प्रत्येक शाळेने मंडळाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पालकांनी या प्रमाणपत्राची विचारणा करणे देखील आवश्यक आहे.
- राज्य सरकारकडून दिले जाणारे इरादापत्र : राज्य शासनाकडून शाळांना इरादा पत्र दिले जाते. त्याची देखील पालकांनी शाळेकडे विचारणा करणे आवश्यक आहे.
"पाल्यांना शाळांमध्ये प्रवेश घेताना पालकांनी इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसोबतच शाळेचा यू-डायस नंबरदेखील तपासून घ्यावा."- पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना