फळझाडे लागवडीसह शेतात सिंचनाच्या साेयी निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:54+5:302021-08-27T04:39:54+5:30
कोरची तालुका मुख्यालयापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेला नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत ...

फळझाडे लागवडीसह शेतात सिंचनाच्या साेयी निर्माण करणार
कोरची तालुका मुख्यालयापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेला नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत साल्हे या गावाने स्वत: ग्रामपंचायतीला आमंत्रित करून मध संकलन केंद्रात सभा घेतली. याप्रसंगी राेजगार हमी याेजनेच्या एपीओ सरोज तितरमारे, तहसील कार्यालयातील निनावे, नवरगावच्या कौशल्या काटेंगे, उपसरंपच रामदास कुमरे, ग्रामसेवक दामोदर पटले, ग्रामपंचायत सदस्य अरविंदाताई होळी, दुर्पता गावळे, तंमुस अध्यक्ष झाडुराम हलामी, पाेलीसपाटील समशीला कुमरे, ईजामसाय काटेंगे, ग्रामसभा अध्यक्ष चमरू होळी, सचिव दलसाय गोटा तसेच बचतगटातील महिला व पुरुष उपस्थित होते. मागील वर्षी राेजगार हमीची कामे सुरू न झाल्याने राेजगार मिळाला नाही. त्यामुळे राेजगाराची आवश्यकता आहे. मध संकलन केंद्र भवनात विविध राज्यांतील अभ्यासक, शिकणारे विद्यार्थी येऊन थांबतात. निवासी राहतात; परंतु येथे पिण्याच्या व वापराच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने अडचण आहे. तसेच विद्युत जोडणीकरिता ऑनलाइन अर्ज करूनही विद्युत कनेक्शन मिळाले नाही, अशी समस्या काटेंगे यांनी मांडली. ग्रामसचिव पटले व सरपंच काटेंगे यांनी पंधरा दिवसांच्या आत ग्रामपंचायतकडून पाण्याची व्यवस्था करण्याची हमी दिली. राेजगार हमी याेजनेंतर्गत लेबर बजेट तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आराखडा तयार करताना तीन पद्धतीने विभाजन करण्याचे ठरविण्यात आले. सभेनंतर तलाव व नाला बांधकामासाठी जागेची पाहणी करून ती निश्चित करण्यात आली.
बाॅक्स
याचे झाले नियाेजन
ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये गावातील सर्व कुटुंबांच्या मूलभूत गरजांचे सर्वेक्षण करणे. आराखडा तयार करणे, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शाेषखड्डे तयार करून पाणी मुरविणे. प्रत्येक कुटुंबांच्या सांधवाडीत किमान पाच व त्यापेक्षा अधिक फळझाडांची लागवड करणे, शेतात व पडीक जमिनीत फळझाडांची लागवड करण्याचा आराखडा तयार करण्याचे ठरविले. गौण वनोपजाचे संवर्धन, संरक्षणासाठी आराखडा, रानटी प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था आराखडा, जंगलात पाणी मुरविण्यासाठी नदी, नाले, ओढे यांचा आराखडा तयार करण्याचे ठरले. ही सर्व कामे पेसा मोबिलायझर बचतगटाकडून करून घेण्याचे ठरले.