तलावांच्या दुरूस्तीमुळे सिंचन वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:11+5:302021-04-21T04:36:11+5:30
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे ...

तलावांच्या दुरूस्तीमुळे सिंचन वाढले
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व बोड्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावांचे दुरूस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
पोर्ला येथील विश्रामगृहाची दुरवस्था
पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले. परंतु या विश्रामगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृह दुरवस्थेत आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे. या विश्रामगृहाच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छतागृहांअभावी पसरली दुर्गंधी
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रिघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रिघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे कायम
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुरूस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताची मोहीम थंडावली
गडचिरोली : गेल्या काही दिवसापासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्त करिता काही महिन्यापूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
देसाईगंजात गंजलेले, जीर्ण खांब बदलवा
देसाईगंज : नगरपरिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले आहेत. सदर खांब कधीही कोसाळण्याचा धोका आहे. सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कठड्यांअभावी अपघाताची शक्यता
चामोर्शी : गडचिरोली मार्गावरील पोहर नदीत चिचडोह बॅरेजचे पाणी साचले आहे. या नदीवरील पूल अरूंद आहे. तसेच या पुलावार लोखंडी कठडे उभारण्यात आले नाही. त्यामुळे एखादे वाहन कोसळून धोका होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वर्दळ पाहता पोहर नदीवर कठडे लावावे.
मोहझरीतील रस्त्यावर खड्डेच खड्डे
गडचिरोली : गडचिराेली पासून १२ किमी अंतरावर असलेल्या मोहझरी गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव
गडचिरोली : शहराच्या कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
कुरखेडातील अंतर्गत नाल्या तुंबल्या
कुरखेडा : शहरातील नाल्यांचा प्रशासनाच्या वतीने अनेक दिवसापासून नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत.
कोडसेपल्लीतील समस्या साेडवा
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण येत आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा
सिरोंचा : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे. परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रूपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएल पासून वंचित आहेत.
कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
विसापूर मार्गाची तत्काळ दुरूस्ती करा
गडचिरोली : येथील आठवडे बाजार परिसरातून विसापूर व विसापूर टोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील डांबरीकरण पावसाने पूर्णतः उखडले आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी कर्मचारी, विद्यार्थी व इतर वाहनधारकांना त्रास होत आहे.
लखमापूर बोरीत गतिरोधकाचा अभाव
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथील बसस्थानक परिसरातील शिवाजी चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. चामोर्शी-आष्टी मार्गावर लखमापूर बोरीतील सदर शिवाजी चौक असल्याने येथे गतिरोधकाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जेणेकरून अपघाताला आळा बसेल.
तलाठ्यांना मुख्यालयी ठेवण्याची मागणी
चामोर्शी : तलाठ्यांना मुख्यालयाची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी साजाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे.
तालुक्यात अनियमित वीजपुरवठा
देसाईगंज : तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील कुरूड, कोंढाळा, मोहटोला, किन्हाळा आदी कृषिपंपधारक शेतकरी आहेत. सध्या धान पीक जोमात आहे. या शेतकऱ्यांना अनेकदा शेतीला पाणी द्यावे लागते. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
अंमली पदार्थांच्या सेवनाने आजार वाढले
आष्टी : आहाराच्या बदलत्या सवयी, अंमली पदार्थाचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक जणांना आजाराची लागण होत आहे. त्यामुळे रूग्णालयात गर्दी वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कारवाई होत नाही. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर कारवाईची मागणी होत आहे.
सिकलसेल रूग्णांना मोफत बस प्रवास द्या
कुरखेडा : शासनाने सिकलसेलग्रस्तांच्या मोफत प्रवास सवलतीसाठी कोट्यवधी रूपये उपलब्ध केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मोफत बस प्रवास सवलत लागू करावी. सिकलसेलग्रस्त नागरिक शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत.
अनेक वार्डातील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहने ही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी
धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे. परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता देखील नाही.
मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातून आवागमन करावे लागते. मात्र या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती केव्हा होणार
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.