महिलेच्या तक्रारीत राकाँ नेत्याचा सहभाग
By Admin | Updated: July 17, 2014 00:06 IST2014-07-17T00:06:52+5:302014-07-17T00:06:52+5:30
आसरअली पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी निर्मला व्यंकटी मोगरम या महिलेला मारहाण केलेली नाही. या महिलेच्या तक्रारीमागे सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक

महिलेच्या तक्रारीत राकाँ नेत्याचा सहभाग
आसरअली : आसरअली पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी निर्मला व्यंकटी मोगरम या महिलेला मारहाण केलेली नाही. या महिलेच्या तक्रारीमागे सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता असल्याचा आरोप आसरअली भागातील नागरिकांनी केला आहे.
आसरअली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगधाम पेठा येथे एक मुलगी ३० मे रोजी घरून कुणालाही न सांगता निघून गेली. सदर मुलीच्या वडीलांनी आसरअली पोलीस ठाण्यात १ जून रोजी तक्रार दाखल केली. मुलीचा शोध घेतला असता, महेंद्र व्यंकटी मोगरम याने मुलीला पळवून नेल्याचा संशय रंगधाम पेठा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केला. ३० जूनला महेंद्र मोगरम हाही गावातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे मुलीचा व महेंद्रचा शोध घेण्यासाठी निर्मला मोगरम यांना पोलिसांनी तपासाकरिता बोलविले. महेंद्र मोगरम याने २०१० मध्येही एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
गावकरी या घटनेमुळे संतप्त होते. त्यांनी निर्मला मोगरम यांनाही मारहाण केली असती, त्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी ठाण्यात बोलाविण्यात आले व दिवसभर ठेवण्यात आले, अशी माहिती आसरअली पोलिसांनी लोकमतला दिली आहे. दरम्यान ५ जुलै रोजी नलीकुडा येथे जनजागरण मेळाव्यात पोलीस व्यस्त असतांना सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी पत्रकारांच्या समक्ष पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्या बेकायदेशिर धंद्यांबाबत वरिष्ठांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली होती. या महिलेच्या तक्रारीमागेही तेच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.