सिरोंचातील रेती तस्करीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 01:48 IST2017-02-26T01:48:48+5:302017-02-26T01:48:48+5:30
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करीत असताना सुमारे ६९ ट्रक पकडण्यात आले;

सिरोंचातील रेती तस्करीची चौकशी करा
विजय वडेट्टीवार यांची तक्रार : पकडलेल्या वाहनांवर नाममात्र दंड आकारल्याचा आरोप
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करीत असताना सुमारे ६९ ट्रक पकडण्यात आले; मात्र त्यांच्यावर नाममात्र ७ लाख २ हजार रूपये दंड आकारून सदर वाहने सोडून देण्यात आली. यात कोट्यवधी रूपयांच्या रेतीची तस्करी केली जात आहे. याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे प्रधानसचिव यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुंटा, नगरम, वडधम, अंकिसा, चिंतरेवला, मुपीगुड्डा या रेतीघाटांचा लिलाव ई-टेंडरींगद्वारे करण्यात आला. रेती तस्करांनी अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून रेतीघाटाचा लिलाव विकत घेतला आहे. या रेतीघाटांच्या लिलावांमुळे रेती तस्करांना रानच मोकळे झाले आहे. अहेरीचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तरित्या २१ फेब्रुवारी रोजी ११.३० वाजताच्या सुमारास गोदावरी नदी पात्रातील वाळूघाटावर धाड टाकली. या धाडीत ट्रक व जेसीबीसह ६९ वाहने आढळून आली. यातील २७ वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरल्याचे आढळून आले. फक्त वाळूने भरलेली ट्रक तहसील कार्यालयात जमा करून उर्वरित रिकामे ४२ ट्रक रेती घाटावरच ठेवण्यात आले. या गंभीर प्रकरणाची तातडीने कारवाई करणे आवश्यक असताना केवळ वाळूने भरलेल्या २७ ट्रकवर ७ लाख २ हजार रूपयांचा दंड ठोठावला व ती वाहने सोडून देण्यात आली. या वाहनांवर किमान पाच कोटींच्या वर दंड ठोकणे आवश्यक होते. मात्र अत्यंत कमी दंड ठोकल्याने शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोदावरी नदी पात्रातून एका दिवसात १५० ते २०० ट्रक रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी सिरोंचाचे तहसीलदार व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली असता, रेती तस्कराच्या गुंडांनी नागरिकांना मारहाण केली आहे. प्रशासनाने नागरिकांवरच खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मद्दिकुंटा घाटावरही नागरिकांनी आंदोलन केले असता, गुंडांनी मारहाण केली. रेती कंत्राटदाराने आजपर्यंत अनेकवेळा वाळू लिलावाच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार वडेट्टीवार यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)