नोकर भरतीची चौकशी करा
By Admin | Updated: March 1, 2015 01:44 IST2015-03-01T01:44:47+5:302015-03-01T01:44:47+5:30
गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात कार्यरत असताना प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांनी ३२ पदांची नोकर भरती करविली होती.

नोकर भरतीची चौकशी करा
गडचिरोली : गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात कार्यरत असताना प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांनी ३२ पदांची नोकर भरती करविली होती. या भरतीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोळ करून आर्थिक लाभ मिळविला. याबाबत तत्कालीन राज्य सरकारकडेही तक्रार करण्यात आली होती. परंतु मेंडके यांचे पाठीराखे सरकारमध्ये असल्याने या प्रकरणाची चौकशी न करता सदर भरती प्रकरणातील गैरव्यवहार दाबून टाकण्यात आला. मेंडके यांना सध्या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी मेंडके यांची याही प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.
गडचिरोली प्रकल्पात दिगांबर मेंडके २०११ ते मे २०१४ या कालावधीत कार्यरत होते. याच काळात त्यांनी २०१२ मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्तपद भरती केली. या पद भरतीत मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य काम करण्यात आले. उमेदवारांकडून पैसेही जमा केल्याच्या तक्रारी झाल्या. पात्र उमेदवाराची पहिली यादी कार्यालयाच्या बोर्डावर लावण्यात आली होती. त्यानंतर लगेच ती फाडून दुसरी लावण्यात आली. यात पैसे देणाऱ्या उमेदवाराचे नाव घालण्यात आले, असा आरोप तक्रारकर्ते किसन मानकर यांनी केला आहे. यासंदर्भात मानकर यांनी माहिती अधिकारात २१ एप्रिल २०१२ ला प्रकल्प कार्यालयाकडे माहिती मागितली. या कार्यालयाने २४ मे २०१२ पर्यंत मानकर यांना कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेची माहितीच उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर २९ जून २०१२ ला चुकीची व खोटी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. मेंडके यांच्या कार्यकाळात झालेल्या या भरती प्रक्रियेत एका मुक व बधीर असलेल्या उमेदवाराला तोंडी परीक्षेत २५ गुण देण्याचा धक्कादायक प्रकारही घडलेला आहे. मुकबधीर असलेल्या उमेदवाराची मौखीक परीक्षा घेतली कशी, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता, यासंदर्भात तत्कालीन आदिवासी विकास मंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र तत्कालीन आघाडी सरकारमध्ये मेंडके यांचे पाठीराखे मंत्री असल्याने सर्वसामान्य तक्रारकर्त्याच्या तक्रारीला न्याय मिळाला नाही, असे किसन मानकर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात उमेदवारांची यादी मागण्यासाठी ३१ आॅगस्ट २०१२ ला अपीलीय अर्ज करण्यात आला. यावेळीही प्रकल्प अधिकारी मेंडके यांनी चुकीची माहिती मानकर यांना दिली. मेंडके यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकर भरतीत कोट्यवधी रूपये जमविण्यात आले. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या मेंडके यांच्या संपत्तीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या तक्रारीत केली आहे.
गडचिरोली पोलिसांनीही मेंडके यांच्या कार्यकाळातील नोकर भरतीची चौकशी करावी, अशी मागणीही विविध संघटनांकडून होत आहे.