धंदरेंच्या मृत्यूची चौकशी करा
By Admin | Updated: May 17, 2015 02:10 IST2015-05-17T02:10:32+5:302015-05-17T02:10:32+5:30
मुलचेरा पंचायत समितींतर्गत बोलेपल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भैय्याजी धंदरे यांचा १३ मे रोजी अपघाती मृत्यू झाला.

धंदरेंच्या मृत्यूची चौकशी करा
गडचिरोली : मुलचेरा पंचायत समितींतर्गत बोलेपल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भैय्याजी धंदरे यांचा १३ मे रोजी अपघाती मृत्यू झाला. चामोर्शी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे धंदरे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करीत सदर मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व ग्रामसेवक संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, बोलेपल्ली ग्रा.पं.चे ग्रामसेवक भैय्याजी धंदरे यांच्या दुचाकीला गडचिरोली तालुक्यातील दर्शनी गावाजवळ १० मे रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला. रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी इसमाने ग्रामसेवक धंदरे यांना चामोर्शी पोलीस ठाण्यात नेऊन या घटनेची माहिती दिली. मात्र चामोर्शी पोलिसांनी या घटनेची नोंद न करता संबंधित अनोळखी इसमास रूग्णालयात नेऊन दाखल करण्याचा सल्ला दिला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे जखमी ग्रामसेवक धंदरे यांना उपचार मिळाला नाही. त्यानंतर १२ मे रोजी चामोर्शी तालुका कृषी फळ रोपवाटीकेचे कर्मचारी जेंगठे व मुंडे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची लेखी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्यांच्याही तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप ग्रामसेवक संघटनेने निवेदनात केला आहे.
धरणे आंदोलनात जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भैय्याजी मुद्देमवार, सचिव ज्ञानेश्वर भोगे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस सवरंगपते आदीसह ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष, सचिव व जिल्ह्यातील बाराही पंचायत समितीचे ग्रामसेवक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)